कर्जत : नगरपरिषदेवर भगवा फडकला, आता पाच वर्षात कर्जतचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देतो.भिसेगाव कर्जत सबवे बनवणार, कर्जतमधील नदी संवर्धन, भूमिगत गटार, भूमिगत केबल आदी प्रश्न मार्गी लावणार आहे असे सांगून हा एकीचा विजय आहे या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.कर्जत नगरपरिषदेवर शिवसेना-भारतीय जनता पार्टी- आरपीआय महायुतीने विजय मिळवला. या आनंदाप्रीत्यर्थ सुवर्णयुग विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते.कर्जतमधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशाचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्र्नांडिस यांना दोन मिनिटे उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. या निवडणुकीत जनतेने ठाम निर्णय केला होता म्हणून परिवर्तन झाले. विरोधकांचे राजकारण दडपशाहीचे होते हे जास्त काळ टिकत नाही येथील व्यापाऱ्यांनी दडपशाहीला बळी न पडता युतीला मतदान केले. नगरपरिषदेमध्ये घराणेशाहीचे राजकारण सुरू होते, सत्ता एककेंद्रित करण्यासाठी हा मांडलेला डाव होता. कर्जतचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते आम्ही मार्गी लावू, असे आश्वासन उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांनी दिले. किशोरी पेडणेकर यांनी आपण सुवर्ण युगाची मागणी केली होती कर्जतकरांनी ती दिली. आता कर्जतकर दहशतीच्या सावटाखालून निघाले आहेत. संतोष भोईर यांनी मतदारांना परिवर्तन पाहिजे होते ते या निवडणुकीत दाखवून दिले. राहुल डाळींबकर यांनी आमचा वापर करून यांनी फक्त सत्ता भोगली. आता आम्ही कर्जतमध्ये ड्रीम प्रोजेक्ट राबवू. रमेश मुंढे यांनी विरोधकांनी खूप भूलथापा दिल्या, आता त्यांच्या भूलथापांना कर्जतकर बळी पडणार नाही. सुवर्णा जोशी यांनी जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे तो आम्ही सार्थ करू असे सांगितले.याप्रसंगी व्यासपीठावर रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख किशोरी पेडणेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर,भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दस्ताने, आरपीआय जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, युवासेना जिल्हाधिकारी मयूर जोशी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर आदींसह तीनही पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
कर्जतमधील सर्व प्रश्न मार्गी लावणार- श्रीरंग बारणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:30 PM