श्रीवर्धन : चक्रीवादळानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून श्रीवर्धनमध्ये पावसाने जोर पकडला आहे. श्रीवर्धन तहसील कार्यालयाकडून दरड प्रवण भागातील लोकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, या आदेशास स्थानिक लोकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. श्रीवर्धन शहरामधील गणेश आळी, धोंड गल्ली व मेटकर्णी या भागात दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गणेश आळीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य खबरदारी घेत संबंधित सर्व लोकांना नगर परिषद शाळा नंबर १मध्ये स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार श्रीवर्धन तहसील कार्यालयाकडून संबंधित ११ कुटुंबांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असे तहसीलदार सचिन गोसावी यांनी सांगितले.गणेश आळीतील लोकांशी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संवाद साधलेला आहे. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांना सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाऊस जर मोठ्या स्वरूपात झाला तर दरड कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तरी कृपया लोकांनी कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करू नये व तालुका प्रशासनाला सहकार्य करावे व सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. - सचिन गोसावी, तहसीलदार, श्रीवर्धनश्रीवर्धनमधील गणेश आळी सगळ्यात मोठे दरड प्रवण क्षेत्र आहे. संबंधित लोकांनी कोणताही धोका पत्करू नये जेणेकरून जीवितहानी होईल. श्रीवर्धन नगर परिषदेने संबंधित लोकांची व्यवस्था नगर परिषदेच्या शाळेत केलेली आहे. तरी लोकांनी सहकार्य करावे ही विनंती.- किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, श्रीवर्धननागरिकांबरोबर अधिकाऱ्यांची चर्चापावसाळा सुरू होण्यापूर्वी श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांनी दरड प्रवण भागातील नागरिकांशी संभाव्य धोका लक्षात घेऊन चर्चा केली आहे. गणेश आळीत १५० च्या जवळपास लोकसंख्या आहे. वादळाने श्रीवर्धनमध्ये आर्थिक हानी घडवून आणलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य त्रासले आहेत. या वर्षी पावसाचे प्रमाणसुद्धा जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांनी स्थलांतरित होणे आवश्यक आहे.