- संतोष सापते श्रीवर्धन : मराठी अस्मितेला देशाच्या कानाकोपऱ्यात सन्मानाचे स्थान निर्माण करणाºया आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या स्मारकाची त्यांच्या जन्मगावी अवहेलना होत असल्याचे दिसून येत आहे. स्मारकाच्या प्रांगणात गवत व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. पर्यटक निधीतून नगरपालिकेच्या तिजोरीत वर्षभरात २ लाख ३४ हजार २८५ रु पये जमा झाले आहेत. परंतु पर्यटकांचे आकर्षण असलेल्या आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्य सरकारने स्मारक जीर्णोद्धारासाठी तत्त्वत: १८ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे. श्रीवर्धन नगरपालिका व लक्ष्मी नारायण न्यास यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त आहे.पेशवे स्मारकाची जागा नगरपालिका व लक्ष्मी नारायण न्यास यांच्या ताब्यात आहे. नगरविकास, पर्यटन व सांस्कृतिक विभाग यांच्या समन्वयातून पेशवे स्मारकाचे नूतनीकरण होणार आहे. श्रीवर्धनमध्ये १९८८ मध्ये पेशवे स्मारकाची उभारणी केली होती. तत्कालीन विधान परिषद सभापती जयंत टिळक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. बाळाजी पेशव्यांचा पूर्णाकृती पुतळा व चार खोल्यांचे सभागृह बांधले होते. त्यानंतर आजतागायत कुठलेही नवीन बांधकाम करण्यात आले नाही. सद्यस्थितीत स्मारक परिसरात सर्वत्र गवत वाढले आहे. भटक्या कुत्र्यांचा याठिकाणी वावर असतो. स्मारकाच्या वास्तूला दोन प्रवेशद्वार होते. मात्र एक कमानीचे प्रवेशद्वार धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाल्याने गेल्या वर्षी नगरपालिका प्रशासनाने कमानीचा वरचा ढाच्या जमीनदोस्त केला. दुसºया प्रवेशद्वाराचीही एक बाजू तुटली आहे. त्यामुळे मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांचा स्मारक परिसरात संचार वाढला आहे.स्मारकाच्या चारही बाजूस गवत वाढले आहे. तसेच बांधण्यात आलेल्या जुन्या चारही खोल्यांची अवस्था बिकट झाली आहे. कौलारू वास्तूतील काही खोल्यांचे दरवाजे तुटले आहेत. स्मारकातील पेशव्यांच्या पुतळ्याला रंगरंगोटीची गरज आहे.पेशवे स्मारकाच्या संरक्षक भिंतीस विविध ठिकाणी तडे गेले आहेत. स्मारकाच्या प्रवेशद्वाराची कमान तुटल्याने स्मारक परिसरास भग्नावस्था जाणवते. श्रीवर्धन शहरात लाखो रु पये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत, परंतु पेशवे स्मारक त्यास अपवाद ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारकडून तत्त्वत: मंजूर झालेला निधी प्राप्त होईपर्यंत नगरपालिका प्रशासनाने मनुष्यबळाचा योग्य वापर करून किमान स्वच्छता ठेवावी अशी अपेक्षा श्रीवर्धनमधील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.श्रीवर्धनमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे जीवना बंदर, सोमजाई मंदिर,जीवनेश्वर मंदिर व पेशवे स्मारक, सुवर्णगणेश मंदिर ही पर्यटकांसाठी आकर्षण केंद्रेआहेत.नगरपालिकेच्या स्वच्छता विभागास पेशवे स्मारक स्वच्छतेचे निर्देश दिले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने पेशवे स्मारक महत्त्वाचे आहे. स्मारक स्वच्छता तत्काळ केली जाईल.- रविकुमार मोरे, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपरिषदपेशवे स्मारक हे मराठी अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागातून लोक स्मारकास भेट देतात. नगरपालिकेने नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे.- उदय आवळस्कर, रहिवासी, पेशवे आळी श्रीवर्धनपेशवे स्मारकाची नियमित स्वच्छता केली जाते. श्रीवर्धनमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. स्मारकाच्या परिसरात निर्माण झालेले गवत तत्काळ काढले जाईल. तसेच लवकरच डागडुजीही करण्यात येईल.- नरेंद्र भुसाणे, नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपरिषदपेशवे स्मारक नूतनीकरण हा श्रेयवादाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे श्रीवर्धनच्या पर्यटनाचे अतोनात नुकसान होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.- वसंत यादव,पर्यटन सभापती, श्रीवर्धन नगरपालिका
श्रीवर्धनमध्ये पेशवे स्मारकाच्या वास्तूची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:31 PM