श्रीवर्धन रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:41 PM2019-07-25T22:41:33+5:302019-07-25T22:41:49+5:30
पोलिसांसमोर मुख्य आरोपी पकडण्याचे आव्हान : कर्मचारी संघटना, आरोग्य विभाग यांच्यात सकारात्मक चर्चा
श्रीवर्धन : उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत कर्मचारी अक्षय कांबळे यांना झालेल्या जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीचा निषेध नोंदवत गेली चार दिवस रुग्णालयातील ३८ कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी संध्याकाळी जिल्हा आरोग्य विभाग, कर्मचारी संघटना व पोलीस खाते यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री ९ च्या सुमारास रुग्णालयातील कर्मचाºयांना मारहाण झाल्यावर रुग्णालयात कार्यरत कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शनिवारची पूर्ण रात्र कर्मचारी झोपू शकले नाही. मारहाण करणाºया व्यक्तींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला; परंतु गुन्ह्यात समावेश असलेल्या सर्व गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले.
मंगळवारी सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, उपजिल्हा शल्य चिकित्सक मधुकर ढवळे, कर्मचारी संघटनेचे संदीप नागे, परिचारिका संघटनेच्या महिला अध्यक्ष, श्रीवर्धन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव व आंदोलनकर्ते कर्मचारी यांच्यामधील चर्चेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर सदरच्या आंदोलनास तूर्तास एक आठवड्यासाठी स्थगिती देण्यात आली.
मुख्य फरार आरोपीस अटक करावी, नियोजित कामगिरी बजावणाºया कर्मचाºयांना पोलीस संरक्षण मिळावे, मारहाण करणाºया आरोपीवर गुन्हा दाखल करावा व त्यास श्रीवर्धन विभागातून तडीपार करण्यात यावे, अशा विविध मागण्या धरणे आंदोलन करणाºया कर्मचाºयांनी चर्चेत केल्या आहेत. त्या अनुषंगाने मुख्य आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत रुग्णालयाच्या परिसरात सदैव एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे.
मुख्य आरोपीस अटक करण्याच्या कालावधीसंदर्भात पोलीस खात्याने कोणतेही आश्वासन दिले नाही. यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. मात्र, पोलीस तपास करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कर्मचारी संघटनेच्या संदीप नागे यांनी राज्यातील सर्व सभासद श्रीवर्धन रुग्णालयातील कर्मचाºयांच्या सोबत ठामपणे उभे आहेत. सर्वसामान्य रुग्णांना त्रास होऊ नये तसेच पोलीस खात्याच्या सक्षमतेवर आमचा विश्वास असल्याने सर्व आरोपी लवकरात लवकर गजाआड असतील असे सांगितले, तसेच आरोपींना पकडण्यात विलंब झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असे नागे म्हणाले.