Cyclone Nisarga: श्रीवर्धन, म्हसळा महिनाभर अंधारात; निसर्ग चक्रीवादळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 03:21 AM2020-07-03T03:21:39+5:302020-07-03T03:22:01+5:30
वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याने नाराजी
दिघी : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याला फटका बसला. त्यामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र प्रशासनाने जलदगतीने कामाला सुरुवात करून वादळामुळे पडलेली झाडे बाजूला करून रस्ते वाहतूक सुरू के ली. तसेच जिल्ह्यातील वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.
निसर्ग चक्रीवादळामुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत वीजपुरवठा सुरू झाला; मात्र श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात अद्यापही अंधारच आहे. गावोगावी स्थनिक ग्रामस्थ स्वत:हून पुढे येत विजेचे खांब उभे करण्यासाठी श्रमदान करीत आहेत. महावितरण व कंत्राटदार यांच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांना साथ देण्याचे काम ग्रामस्थ करीत आहेत.
निसर्ग चक्रीवादळामुळे श्रीवर्धन तालुक्यातील वीजपुरवठा करणाºया वाहिन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील इतरत्र वीजपुरवठा सुरळीत झाला असताना श्रीवर्धन व म्हसळा तालुका मात्र एक महिना उलटूनही अंधारात आहे. याबाबत येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
प्रशासन अपयशी
३ जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळला एक महिना पूर्ण होत आहे. एक महिन्यानंतरदेखील वीजपुरवठा सुरू होत नाही हे प्रशासनाचे अपयश असल्याचे दिसते. ग्रामीण भाग आजही अंधारात आहे.
गोंडघर - बोर्लीपंचतन रस्त्यावरील भूमिगत वीजवहिनीमध्ये बिघाड झाल्याने सुरू झालेला वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याची दुरुस्ती सुरू असून लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल. - महेंद्र वाघपैंजन, महावितरण उपअभियंता श्रीवर्धन