बोर्ली पंचतन - श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सात ते आठ भटकी कुत्री चुकून वाट हरविलेल्या सांबराच्या पिल्लाचा मागोवा घेत त्याला मारण्याचा प्रयत्न करीत आल्याचे तेथे उपस्थित नागरिकांनी पाहिले. प्रसंगावधान दाखवून कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाची सुटका के ली. सांबराच्या मानेला कुत्र्याने चावा घेतल्याने त्याला जखम झाली होती. ग्रामस्थांनी वनखात्याच्या वनरक्षकांकडे सांबराला सुपूर्द केले व वनखात्याने त्यावर उपचार करून जंगलात सोडून दिले.श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सध्या किरकोळ पर्यटक असल्याने समुद्र किनारी असणारे जीवरक्षक प्रितम भुसाणे, तसेच ग्रामस्थ अरफान बाक्कर, अर्षद बोदलाजी, रवींद्र दवटे यांनी सात ते आठ भटके कुत्रे समुद्रकिनारी एका छोट्या प्राण्याचा माग करीत त्याच्यावर हल्ला करीत असल्याचे पाहिले. त्यांनी लगेचच त्याठिकाणी धाव घेत भटक्या कुत्र्यांना हाकलून लावले व पाण्यामध्ये पळणाऱ्या सांबराच्या पिल्लाला शिताफीने पकडले.पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर सांबराच्या मानेला कुत्र्यांनी चावा घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावचे सरपंच उदय बापट यांच्या मदतीने त्यांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना सदर प्रकार सांगितला. तत्काळ वनरक्षक दीपक शिंदे, वनरक्षक भास्कर राठोड,बुराण शेख, दिनेश गिराणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांबराच्या पिल्लाला ताब्यात घेतले व दांडगुरी येथील पशुधन विकास अधिकारी मानसिंग शिसोदे यांनी त्या सांबराच्या मानेला झालेल्या दुखापतीवर प्राथमिक उपचार केले व वनखात्याच्या कर्मचाºयांनी सांबराच्या पिल्लाला श्रीवर्धन मार्गावरील हुनरवेली गावच्या छोट्या जंगलात सोडून दिले.जंगलच कमी झाल्याने वन्यप्राणी अशी समुद्राच्या किनारी असलेल्या झाडीमध्ये वास्तव्यास राहत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव समुद्र किनारी वाढत असून पर्यटकांना देखील कुत्र्यांचा त्रास होत असतो. समुद्र किनारी असणाºया जीवरक्षक व ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखविल्याने सांबराच्या पिलाचा जीव वाचला.
श्रीवर्धनमध्ये कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 1:38 AM