श्रीवर्धनमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती सुरू; नगरपालिकेचा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:44 PM2020-02-05T23:44:11+5:302020-02-05T23:44:31+5:30
संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट; नागरिकांकडून कौतुक
- संतोष सापते
श्रीवर्धन : येथील नगरपालिकेने शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत विविध भागांतील संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने खतनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाला २०१३ मध्ये सुरुवात झाली होती. मात्र, तत्कालीन खतनिर्मिती करणाऱ्या संस्थांना या प्रकल्पाद्वारे खतनिर्मिती करण्यात अपयश आले. आजमितीस हा प्रकल्प यशस्वी होत असताना दिसत आहे. खतनिर्मितीला वेग आल्याने संकलित कचऱ्याचे निर्मूलन शक्य झाले आहे. यापूर्वी प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात कचºयांचे ढीग निदर्शनास येत होते.
श्रीवर्धन नगरपालिका नियमित स्वच्छता कर्मचाºयांच्या मार्फत शहरातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबवत असल्याचे निदर्शनास येते. नगरपालिका स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी विविध सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नियमित स्वच्छतेविषयीची माहिती जनतेपर्यंत पाठवण्याचे काम केले जात आहे. नगरपालिका कचऱ्याचे वर्गीकरण सुका व ओला असा करत आहे, त्यामुळे खतनिर्मिती करणे सोपे झाले आहे. हा प्रकल्प अनेकदा श्रीवर्धनमधील जनेतच्या चर्चेचा विषय बनला होता. पावसाळ्यात प्रकल्प परिसरात जमा कचºयाची समस्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी डोकेदुखी ठरत होती. या वर्षी खतनिर्मितीसाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे शहरातील जमा कचºयापासून तत्काळ खतनिर्मिती शक्य होणार आहे.
निर्मित खत हे शेतीसाठी उपयुक्त असून, स्थानिक शेतकऱ्याना सहज उपलब्ध होत आहे. कोकणात नारळ, सुपारी, काजू या पिकांसाठी अनुकूल वातावरण असते. नगरपालिकेकडून अल्प दरात शेतकऱ्यांसाठी खत उपलब्ध झाल्यास त्याचा निश्चितच फायदा सर्वसामान्य शेतकºयाला होऊ शकतो. निर्मित खत हे चार रुपये व सहा रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. संचित कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने सयंत्राद्वारे विलीनीकरण करून खत निर्माण केले जात आहे.
श्रीवर्धन नगरपालिका स्वच्छता अभियान राबविण्यात यशस्वी ठरत आहे. सर्वसामान्य नागरिक अतिशय चांगला प्रतिसाद देत आहेत. कचºयापासून खतनिर्मितीला वेग प्राप्त झाला आहे. शेतकरी वर्गासाठी माफक दरात खत उपलब्ध केले आहे.
- जितेंद्र सातनाक, नगराध्यक्ष, श्रीवर्धन