- संतोष सापते श्रीवर्धन : श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यातील कोळी समाजाला ‘तितली’ वादळाचा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. अरबी समुद्रातील भूगर्भीय हालचालींमुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे समुद्रातील मासळी उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी, मासळी व्यावसायिकांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान झाले; परंतु समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जुलै महिन्यापासून पाऊस अचानक कमी होत आॅगस्ट महिन्यात पूर्णपणे बंद झाला. कोळी समाजाला बारमाही उत्पन्नाचा कुठलाही स्रोत उपलब्ध नाही. बोटबांधणीसाठी येणाऱ्या खर्चासाठी सरकारी मदत मिळत नसल्याचे कोळी बांधवांनी सांगितले आहे. मच्छीमारी व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक प्रत्येक वर्षाला कोळी बांधव करतात. या वर्षी भूगर्भीय हालचालींचे पडसाद मासळी उत्पन्नावर पडले आहेत. ‘तितली’ वादळाच्या कालावधीत असंख्य खलाशी बोटीवरील काम सोडून गेल्याचे निदर्शनास येते आहे, तसेच उपलब्ध मनुष्यबळाचा खर्च बोटमालकाला करावा लागत आहे. पावसाचा अभाव व नैसर्गिक कारणास्तव समुद्रातील मासळीचे घटलेले उत्पन्न मच्छीमारी व्यवसायाला त्रासदायक ठरत आहे, त्यामुळे कोळी समाजात प्रचंड नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर, भरडखोल, दिघी बंदर, आदगाव, रोहिणी, आडी तसेच म्हसळ्यातील वाशी येथे मच्छीमारी केली जाते.रोजंदारीवर काम करणारा मोठा वर्ग मासळी व्यवसायावर अवलंबून असल्याने संबंधित लोकांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात महिलांचे प्रमाण जास्त आहे. कोळी समाजात शिक्षणाचे प्रमाण नगण्य असल्याने इतर रोजगाराचे साधन उपलब्ध होणे अशक्य आहे.शासन मदतनिधी तरतुदीची अपेक्षाश्रीवर्धनमध्ये कोळी समाजाची लोकसंख्या अंदाजे २२,०५०च्या जवळपास आहे. श्रीवर्धन तालुक्यातील जीवना कोळीवाडा, मूळगाव कोळीवाडा, दिघी, कुडगाव, आदगाव, बागमांडला, भरडखोल, दिवेआगार तसेच म्हसळा तालुक्यात रोहिणी, तुरुबाडी, वाशी या ठिकाणी कोळी समाजाचे वास्तव्य आहे. मासळी व्यवसायात कोळी समाजाच्या समवेत मुस्लीम समाजातील काही घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, कोळी समाजासाठी शासनाच्या मदतनिधीची तरतूद व्हावी, अशी अपेक्षा श्रीवर्धनमधील जनता करत आहे.या पूर्वीच्या आघाडी सरकारने श्रीवर्धन तालुक्यातील कोळी समाजासाठी विशेष पॅकेजची तरतूद केली होती. त्यामुळे आमच्या अनेक समस्या कमी झाल्या होत्या. डिझेल सबसीडी मिळाली होती. विद्यमान सरकारने कोळी समाजाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.- मोहन वाघे, रहिवासी,श्रीवर्धन जीवना कोळीवाडाया वर्षी मासळीचा दुष्काळ पडला आहे. बोटीच्या मालकाचा डिझेल खर्चसुद्धा भागत नाही. खलाशी व तांडेल यांचा पगार देणे अवघड झाले आहे. सरकारने मदत करावी ही अपेक्षा आहे.- चंद्रकांत वाघे, अध्यक्ष, कोळी समाज, श्रीवर्धनकोळी समाजाच्या प्रश्नांना आम्ही नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या वर्षी कोळी समाजाच्या निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करण्याचा निश्चित प्रयत्न करू. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यांतील कोळी समाजाला आघाडी सरकारच्या काळात सुनील तटकरे यांनी विशेष पॅकेज दिले होते.- अदिती तटकरे, अध्यक्ष,जिल्हापरिषद रायगडकोळी बांधवांची विद्यमान परिस्थिती अतिशय खराब आहे. पतपेढीकडून घेतलेले खर्च फेडण्याचा कोळी समाजाच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही कोळी समाजाचे प्रश्न सरकार दरबारी सादर करून त्यांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करू.- श्याम भोकरे,उपजिल्हाप्रमुख, शिवसेना
श्रीवर्धन, म्हसळ्यात मासेमारी धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:40 PM