श्रीवर्धनच्या ‘महावितरण’चे काम रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:47 PM2019-12-18T23:47:44+5:302019-12-18T23:47:51+5:30
उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक; वाकलघर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन ग्रामीण, दिघी, दिवेआगर कार्यालय अभियंत्याविना
गणेश प्रभाळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघी : श्रीवर्धन येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत असणाºया दुय्यम कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ग्राहकांना काम न झाल्याने परत जावे लागते. विभागातील या कार्यालयांचे काम ‘राम भरोसे’ असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. वाढत्या वीजग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागीय अधिकारी भेटत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. ग्रामीण भागातील महावितरण सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्यातील अनेक दुर्गम भागांतून दिघी तसेच वाकलघर येथील कार्यालयात वीजबिल कमी करण्यास आलेल्या ग्राहकाला अधिकारी न भेटल्याने नाराज होत परतावे लागते.
श्रीवर्धन तालुक्यातील पाच ठिकाणी प्रमुख गावांमध्ये दुय्यम अभियंता कार्यालय आहेत. मात्र, वाढत्या वीजग्राहकांच्या समस्येमुळे व तालुक्यातील पाच विभागीय कार्यालय पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचारी व अधिकारी यांच्यावरील ताण वाढू लागला आहे. त्यामुळे महावितरणने पदे भरून सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे. स्थानिक कार्यालयात अधिकारी नसल्याने ग्राहक श्रीवर्धन कार्यालयात येत असतात. मात्र, येथील उपलब्ध कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे विविध कामांसाठी येणाºया ग्राहकांची रांग वाढत असते. रांगेत उभ्या असलेल्या बहुतांशी व्यक्तींच्या तक्रारी वाढीव बिलासंदर्भात असतात. तर काही जण बंद झालेल्या मीटरच्या तक्रारी घेऊन येतात. दर महिन्याला वीजबिल येत नाही, तर कार्यालयात घेऊन जावे, असे सांगण्यात येते. वाढीव बिलाबाबत श्रीवर्धन येथे ये-जा होत असल्याने वीजग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
साहेबांना भेटा
महावितरण कार्यालयात तक्रार घेऊन जाणाºया ग्राहकांच्या समस्येचे निवारण होत नाही. वीजबिलावर संबंधित मीटरचा फोटो असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक बिलावर फोटोच नसतात. फोटो असले तरी सुस्पष्ट नसतात, अनेक ग्राहकांना बिल येतच नाही. याविषयी चौकशी केल्यास, मंडळाकडे आपली रक्कम अधिकची आल्याने बिल पाठविले असल्याचे सांगतात. अनेक ग्राहकांना मजुरीचे काम सोडून या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. कर्मचाºयांना विचारल्यास साहेबांना भेटा, असे सांगण्यात येते. विद्युत अभियंते कार्यालयात सापडतच नाही. त्यामुळे ग्राहकांना तासन्तास वाट बघत बसावे लागते.
पदे रिक्त असल्याने सेवेचा बोजवारा
महावितरण कंपनीत शाखा अभियंता, लाइनमन, वायरमन, आॅपरेटर आदीसह विविध प्रकारची पदे कार्यरत आहेत. ग्राहकसेवेच्या दृष्टीने प्रामुख्याने लाइनमन, असि. लाइनमन आणि शाखा अभियंता या पदांना अधिक महत्त्व आहे. इतर पदेही तितकीच महत्त्वाची असली तरी या पदाचा थेट ग्राहक सेवेवर परिणाम होतो. मात्र, गेल्या काही वर्षांत श्रीवर्धनमध्ये लाइनमन, असि. लाइनमन आणि शाखा अभियंता ही पदे रिक्त राहत आहेत. याकडे कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असते. मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने ग्राहक सेवेचा बोजवारा उडत आहे.
तालुक्यातील बहुतेक गावात घरातील माणसे मोलमजुरीसाठी घराबाहेर जात असल्याने कामाच्या व्यापात बिल भरण्यास वेळ लागतो. दोन दिवसांत ते भरले नाही तर डीपीसी भरावा लागत आहे. शिवाय, वेळेत रीडिंग घेत नसल्याने पुढील वेळेला वाढीव बिल येईल, अशी भीती नागरिकांना असते. महावितरण आता बिल थकले की, लगेच वीजपुरवठा खंडित करते. हा नेहमीचाच प्रकार असून रीडिंग घेणाºया कर्मचाºयावर कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाहीत. परिणामी, अंदाजे रीडिंग घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. ऐनवेळी अवाजवी देयक येत असल्याने ग्राहक हवालदिल झाले आहे. - श्रीधर शेलार, गाव अध्यक्ष, वाकलघर.
वाकलघर कार्यालयाला कुलुप
1तालुक्यातील वाकलघर येथील दुय्यम अभियंता कार्यालय नेहमीच बंद असते. या कार्यालयासंबंधित बोर्ला, वावेपंचतन, धनगरमलई, देवखोल, नागलोली, नागलोली मधलीवाडी, खुजारे, दांडगुरी, कार्ले या गावांसह इतर वाड्या मिळून १६ गावांचा समावेश आहे.
2वाकलघर परिसरातील ग्राहकांना बिलासंबंधीच्या तक्रारीसाठी श्रीवर्धन येथे जावे लागते. वाकलघर येथील महावितरण दुय्यम कार्यालयात रोशन साथींगे यांची नियुक्ती असून ते प्रशिक्षणासाठी गेल्यामुळे रजेवर आहेत. तेथे उपलब्ध अतिरिक्त अभियंता आदित्य जाधव आहेत.
3सध्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन ग्रामीण, दिघी, वाकलघर, दिवेआगर व उपविभागीय मुख्यकार्यालयीन दोन अशा सात ठिकाणी कनिष्ठ अभियंता पदे रिक्त आहेत.जाधव यांच्याकडे हरिहरेश्वर,श्रीवर्धन ग्रामीण, दिवेआगर व उपविभागीय कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
4वीजबिल कमी करण्यासंदर्भात २० ते ३० कि.मी. अंतरावरून श्रीवर्धन येथे जावे लागते, वाकलघर येथे महावितरणचे कार्यालय असूनही कामकाज होत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.