कर्जत दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:09 PM2020-02-28T23:09:12+5:302020-02-28T23:09:15+5:30
इंटरनेट अभावी काम बंद; नागरिक दस्त नोंदीसाठी प्रतीक्षेत
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ तसेच कर्जत तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज मागील सहा महिन्यांपासून अनियमितपणे सुरू असून इंटरनेटअभावी दस्त नोंदणीचे काम खोळंबले आहे. परिणामी, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना खोळंबून राहावे लागत आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहेत. महसूल विभागाने या संदर्भात लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
कर्जत तालुक्यात सध्या नेरळ व कर्जत तहसील कार्यालयात असलेले दुय्यय निबंधक कार्यालय येथे दस्त नोंदणीकृत करण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र, मागील सहा महिन्यांपासून कधी सर्व्हर डाउन तर कधी इंटरनेट नाही, या कारणांनी दस्तनोंदीचे काम ठप्प झाले असून याचा फटका ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना बसत आहे. त्यांना तासन्तास खोळंबून राहावे लागत आहे. काही वेळा दस्तनोंदीसाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागत असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.
सर्व सामान्यांच्या स्वप्नातल्या घराची खरेदी, जमीन मिळकत, फ्लॅट खरेदी-विक्री, हक्कसोड पत्र या शिवाय अनेक जमीन-जुमला व्यवहारात दस्त नोंदणी करणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाने दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवस्था केली आहे. मात्र, आज सर्वत्र डिजिटल इंडिया म्हणून ओळख निर्माण झालेल्या आपल्या देशात इंटरनेट सेवा मात्र कोलमडून पडत आहेत. मागील २०-२५ दिवसांत कर्जत तालुक्यातील दोन्ही कार्यालयात एकही आॅनलाइन दस्त नोंदणी झाली नसल्याचे समजते.
कर्जत तालुक्यातही दोन्ही दस्त नोंदणी कार्यालयात इंटरनेट बंद असल्याची कारणे सांगून दस्त नोंदणी ठप्प झाली आहे. माझ्या जमिनीच्या १८ खातेधारकांना दरवेळेस एकत्र करून मी ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरून कर्जत दुय्यम निबंधक कार्यालय गाठतो. मात्र, इंटरनेट बंद असल्यास रिकाम्या हाती फिरावे लागते, यामुळे वेळ आणि पैसा वाया जात आहे.
- भरत खडेकर, शेतकरी, बोरगाव, कर्जत
नेरळ दुय्यम निबंधक कार्यालयात आॅक्टोबर २०१९ पासून इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने कामकाजात अडचणी येत आहेत. या संदर्भात वरिष्ठांना, दूरसंचार कंपनीस वेळोवेळी कळविले आहे. मात्र, बीएसएनएलची इंटरनेट सेवा सुरळीत झाली नाही. त्यामुळे या फेब्रुवारी महिन्यात तर फक्त दहा तासच कामकाज होऊ शकले आहे. व्हीपीपीएन या प्रायव्हेट कंपनीच्या इंटरनेटसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुय्यम निबंधक कार्यालयातील अनियमित कामाकाजामुळे आमच्या पक्षकारांना खोळंबून राहावे लागत आहे. दस्तनोंदणी प्रक्रिया आॅनलाइन आहे. इंटरनेट बंद असल्यास प्रक्रिया थांबली जाते. त्यामुळे दोन्हीही पक्षकारांना आपल्या दस्त नोंदणीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
- अॅड. शाकीब पानसरे
रस्त्याच्या खोदकामाचा फटका बीएसएनएलला
पनवेल, खालापूर, खोपोली महामार्गावर महानगर गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबी मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेने टाकलेल्या बीएसएनएलच्या केबल बाधित होत असून, वारंवार इंटरनेटसेवा खंडित होत आहे.