रायगड : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरामुळे ९० रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तत्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील हेटेराे हेल्थ केअर कंपनीकडून पुरवण्यात आलेली रेमडेसिविर इंजेक्शन्स मागे घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
२८ एप्रिल राेजी जिल्ह्यासाठी हेटेराे हेल्थ केअर कंपनीकडून सुमारे ५१० रेमडेसिविर इंजेक्शन पुरवण्यात आले हाेते. पैकी ३१० इंजेक्शन जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांना देण्यात आले हाेते. २९ एप्रिल राेजी तेथील रुग्णांना सदरचे इंजेक्शन टाेचल्यानंतर सुमारे ९० रुग्णांना थंडी आणि ताप आल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर संबंधित कंपनीच्या विनंतीवरूनच इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.
रुग्णांना काही प्रमाणात त्रास झाल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर काही तांत्रिक कारणाने कंपनीने काेविकाेफर नावाच्या बॅच नंबर एचसीएल २१०१३ इंजेक्शनचा वापर थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर पेण येथील रायगडच्या सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत. काेणत्या रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा त्रास झाला याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.