कळंबाेली : पनवेल रेल्वे स्थानक परिसरात पदपथावर राहुट्या उभ्या करण्यात आल्या आहेत. तर बहुतांश ठिकाणी पक्की झोपडी तयार करून येथे वास्तव्य करत असल्याचे चित्र आहे. या परिसरात राहणारे झोपडीधारक मोठ्या प्रमाणात एकत्रित राहत असून मास्कचा वापर करत नसल्याने कोरोना संसर्गाला निमंत्रण दिल्यासारखे आहे. याकडे पोलीस प्रशासनासह पालिका, सिडकोकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने झोपड्यात वाढ होत आहे.
पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाजूला प्रवेशद्वार जवळ असलेल्या मोकळ्या जागेत गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. महिला व लहान मुले पनवेल बसस्थानक परिसर, मार्केट या भागात भीक मागण्यासाठी फिरत आहेत. तोंडावर मास्क नाही, अंगावरील दुर्गंधीयुक्त कपडे अशा स्थितीत लहान मुले नागरिकांना स्पर्श करत भीक मागत आहेत. अनेकदा नागरिकांच्या हातात असलेले खाद्य वस्तू ओढून घेतात. कोरोना काळात अशा मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. राहण्यासाठी पनवेल परिसराचा उपयोग करत आहेत. पदपथावर राहुट्या उभ्या केल्या आहेत. तर काही प्रमाणात पक्की झोपडी तयार करून राहत आहेत. मध्यंतरी पनवेल शहर पोलिसांकडून गर्दुल्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे बसस्थानक उड्डाणपुलाखाली असणाऱ्या गर्दुल्यांनी रेल्वे स्थानक परिसराकडे मोर्चा वळवला आहे. रेल्वे प्रवाशांना दररोज यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानकात बिनधास्त या लोकांचा वावर वाढला आहे. मास्क तसेच कोरोनाबाबतचे कोणतेच नियम यांना लागू होत नाहीत. बिनधास्त फिरत असल्याने शहरातील इतर लोकांच्या संपर्कात भीक मागण्यासाठी येत आहेत. आशामुळे हे कोरोनाचे वाहक बनू शकतात. वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्मार्ट सिटीला गालबोट गर्दुल्यांकडून गाढी नदीशेजारी असलेल्या सिडकोची पाइपलाइन फोडून पाणी वापरले जात आहे. तर या परिसरात राहणारे उघड्यावर शौचास बसत असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत चालला आहे. त्यामुळे दुर्गंधीसुध्दा पसरत आहे. रात्री मद्यप्राशन करून वादविवाद तंटे होत आहेत. जवळच बीट पोलीस चौकी आहे. तरीसुध्दा यावर कारवाई केली जात नसल्याने नागरिकाकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.