सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सिडकोमध्ये बोगस कामगार भरती प्रकरणात सागर तपाडीयाला (५१) सीबीडी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे कटकारस्थान समोर आले आहे. त्याने नागपूर अकोल्यासह नवी मुंबईतल्या गरिबांना सिडकोची घरे मिळवून देतो सांगून त्यांची कागदपत्रे मिळवली. त्याआधारे २८ जणांची कागदोपत्री सिडकोत भरती दाखवून त्यांच्या वेतनाचे करोडो लाटले.
या प्रकरणात सीबीडी पोलिसांनी सूत्रधारासह एका पतपेढी मॅनेजरला अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक नीलेशकुमार जगताप यांचे पथक अधिक तपास करत आहे. सागरने आधार कार्ड, पॅन कार्डद्वारे काहींचे ठिकठिकाणी पतपेढ्या व बँकांमध्ये स्वत:च खाते उघडले. तर काहींना पंतप्रधान आवास योजनेसाठी खाते उघडले. मात्र, पासबुक, चेकबुक व एटीएम स्वत:जवळ ठेवले होते.
रक्कम खात्यात जमा होताच काढून घ्यायचा
वेतनाची रक्कम खात्यात जमा होताच तो काढून घ्यायचा. त्याने २०१५ पासून त्याने टप्प्याटप्प्याने २८ जणांना सिडकोत कामगार भासवून करोडो रुपये लाटले आहेत. त्याच्या घर झडतीमध्ये १२ जणांचे बँक पासबुक आढळून आले आहेत. उर्वरित पुरावे त्याने प्रकरण उघडकीस येत असल्याचे समजताच नष्ट केले. त्याने वापरलेले सर्व बँक खाते पोलिसांनी गोठवली असून त्यामध्ये एकूण एक कोटी नऊ लाख रुपये आढळले आहेत.
यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधची कारवाई
सागर तपाडीया याच्यावर २०१९ मध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागानेदेखील कारवाई केलेली आहे. सहायक वसाहत अधिकारी पदावर असताना त्याने एजंटमार्फत तक्रारदाराचे घर ट्रान्सफर करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना कारवाई झाली होती.
पतपेढीच्या मॅनेजरलाही अटक
सागरच्या सांगण्यावरून पतपेढीत अज्ञात व्यक्तींच्या नावे खाती उघडून दिल्याप्रकरणी पोलिसांनी अकोल्यातील निर्मल पतपेढीच्या मॅनेजरलादेखील अटक केली आहे. त्याची जामिनावर सुटका झाली असून तो सदर खात्यामध्ये जमा झालेली रक्कम काढून कामगारांमार्फत सागरकडे देत होता. तर सागरच्या इतर एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत.