महापे औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची चाळण; मोकळ्या भूखंडावर झोपड्यांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:48 AM2020-07-04T00:48:39+5:302020-07-04T00:48:57+5:30
समस्यांचा डोंगर : रबाळे, महापे, खैरणे, पावणे, तुर्भेत खड्डे
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर टीटीसी एमआयडीसीत रस्ते, गटारे, दिवाबत्ती, डेब्रिज, मोकळ्या भूखंडावर झोपड्यांचे वाढते अतिक्रमण, पाण्याची गळती, ड्रेनेजच्या समस्यांनी अक्षरश: या औद्योगिक क्षेत्रात समस्यांचे डोंगर निर्माण झाल्याची वाईट परिस्थिती पाहावयास मिळते.
रबाळे, महापे, खैरणे, पावणे, तुर्भे आणि नेरुळ या एमआयडीसी भागात सर्वांत मोठी समस्या आहे ती रस्त्यांची. सध्या पावसाळ्यात तर येथील बहुतांश रस्त्यांची चाळणच होताना दिसते. त्यामुळे औद्योगिक वसाहतींत येणाऱ्या वाहनचालक व कामगारांना दररोज खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे तेथे डबकी तयार झाली आहेत. महापे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी लाखो रुपयांची निविदा मंजूर झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, आठ ते दहा महिन्यांचा कालावधी उलटूनही रस्ते बनविले नाहीत. लॉकडाऊनपूर्वी फेब्रुवारीच्या सुरुवातीला विविध कामांसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्यात न आल्यामुळे आजही परिस्थिती जैसे थे आहे. आता कासवगतीने खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरत्या मलमपट्टीचे काम सुरू झाले आहे. हे रस्ते दुरुस्त करावे व उद्योगांना चांगली सुविधा पुरवावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
नवी मुंबई महापालिका एमआयडीसीकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते. त्यामुळे येथील रस्ते दुरुस्तीचे काम नियमानुसार त्यांनीच करायला पाहिजे. मात्र, ते करीत नसल्यामुळे एमआयडीसीला अशी कामे करावी लागतात. रबाळे एमआयडीसीच्या धर्तीवर सिमेंट काँक्रीटचे रस्ते महापेमध्ये आवश्यक ठिकाणी केले जाणार आहेत. कामाच्या निविदा कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात येईल. - एम.एस.कलकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी महापे