सन्मान यात्रा ठरली एकतेचे प्रतीक; अलिबागकरांच्या स्वागताने भारावले लष्करी अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:48 PM2019-01-03T23:48:11+5:302019-01-03T23:48:43+5:30
लष्करी सेवेत शौर्य गाजवणाऱ्या अधिका-यांना प्रत्यक्ष पहिल्यावर, त्यांना सलाम करण्यासाठी अलिबागकरांनी प्रचंड गर्दी केली होती, तर दुसरीकडे समाजातील विविध घटकांनी सन्मान यात्रेत सहभागी होऊन अधिका-यांची आरती करून जल्लोषात स्वागत केल्याने अधिकारीही भारावून गेले होते.
अलिबाग : ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम...’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले होते. लष्करी सेवेत शौर्य गाजवणाऱ्या अधिका-यांना प्रत्यक्ष पहिल्यावर, त्यांना सलाम करण्यासाठी अलिबागकरांनी प्रचंड गर्दी केली होती, तर दुसरीकडे समाजातील विविध घटकांनी सन्मान यात्रेत सहभागी होऊन अधिका-यांची आरती करून जल्लोषात स्वागत केल्याने अधिकारीही भारावून गेले होते.
निमित्त होते लोकमत रायगड कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनाचे. यावेळी आरसीएफ कंपनीने लोकमतच्या सहकार्याने ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अलिबाग समुद्रकिनारी गुरुवारी सकाळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी झेंडा दाखवून सन्मान यात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी सन्मान रथामध्ये लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर, एअर मार्शल (नि.) अरुण गरुड, ब्रिगेडीअर विनोद श्रीखंडे, कर्नल मदन सावंत, मेज. जनरल सतीश वासाडे, कर्नल (नि.) विनायक सुपेकर, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, आरसीएफ (थळ युनिट) कार्यकारी संचालक रवींद्र जावळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सन्मान यात्रेमधील पोलीस बॅण्ड आणि लयबद्ध परेड करणाºया एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रायगड जिल्हा परिषद प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी सर्व अधिकाºयांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान
केला.
आंब्याच्या पानांचा अनोखा पुष्पगुच्छ
अलिबाग-चेंढरे येथील मारुती मंदिरासमोरील चौकात तालुक्यातील शेतकरी संघर्ष समितीने मान्यवरांना भाताच्या लोंब्या आणि आंब्याच्या पानांनी बनवलेला पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ दिले. याप्रसंगी सर्वजण आगरी कोळी समाजाचा पारंपरिक वेश परिधान करून आले होते.
सन्मान यात्रेत सहभागी झालेली गर्दी पाहून भारावून गेलेल्या लष्करी अधिकाºयांनीच या वेळी शेतकºयांच्या सोबतीने ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिल्याने परिसर दणाणून गेला. पीएनपी नाट्यगृहाजवळ आल्यावर सन्मान यात्रेची सांगता झाली. शहरात ठिकठिकाणी मिळालेल्या अनोख्या मानवंदनेने अधिकारी भारावून गेले.