सिग्नल यंत्रणेसाठी २० लाखांचा निधी, वाहतूककोंडी सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:03 AM2017-10-07T02:03:38+5:302017-10-07T02:04:01+5:30
शहरात वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे, यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूकचालकांना लगाम बसणार आहे.
अलिबाग : शहरात वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे, यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूकचालकांना लगाम बसणार आहे. काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र, ती फेल ठरली होती. आता पुन्हा नव्याने ती बसवण्यात आली आहे.
अलिबाग नगरपालिकेच्या प्रस्तावानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी सुमारे २० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यानुसार शहरातील महावीर चौक आणि अशोका सेंटर येथील चौक या दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा सौरविजेवर कार्यान्वित केली जाणार आहे. सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याबाबतच्या प्राथमिक चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या तंत्रज्ञांकडून या यंत्रणेची पाहणी केल्यानंतर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणाºया अलिबागमध्ये हजारो वाहने येत असतात. शनिवारी, रविवारी पर्यटकांच्या वाहनांची भर पडते. अरुंद रस्ते आणि वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. बेशिस्त वाहन चालकांमुळे आणि सहाआसनी रिक्षाने यात अधिक भर पडते. ही समस्या लक्षात घेऊन वाहतूक नियमनच्या दृष्टिकोनातून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार आहे. यानंतर वाहतुकीचे योग्य नियमन होत आहे की नाही, यावर पोलीस देखरेख करणार आहेत. या सिग्नल व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल. वाहतुकीचे योग्य नियमन होईल, असा विश्वास अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला.