- आविष्कार देसाई
अलिबाग : निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मशाली आता थंड झाल्या. दिग्गजांच्या प्रचारसभांमधून तोफांना बत्ती दिल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने वातावरण चांगलेच तापले होते. प्रचारसभांमधून स्थानिक विकासाचे मुद्दे हरवल्याचे दिसून आले. एकमेकांच्या वरचढ कोण हे सिद्ध करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. प्रचाराची सांगता झाल्याने उमेदवार आता छुप्या प्रचारावर भर देणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस सर्वच मतदारसंघात साम, दाम, दंड भेद यावर भर देण्याची शक्यता असल्याने निवडणूक विभागाचे लक्ष राहणार आहे.
गेल्या १५ दिवसांपासून सातही विधानसभांमधून प्रचाराचा धुरळा उडत आहे. आपल्याच उमेदवाराला विजयी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चांगलीच कंबर कसली होती. युती विरोधात आघाडी, असाच सामना रंगणार आहे. सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांना प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अवजड उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या. या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दिग्गजांनी एकमेकांवर आसूड ओढले. त्यामुळे वातावरणात चांगलीच रंगत आली. दिग्गजांच्या सभांनी गर्दी खेचली; परंतु त्यातून मतदारांची मन जिंकली का? हे निकाल लागल्यावरच कळणार आहे.
मोठ्या प्रमाणात प्रचारसभा झाल्या. मात्र, त्या प्रचारसभांमधून एकमेकांची उणीधुणी काढण्यात आल्याने स्थानिक विकासाचे प्रश्न नेहमीप्रमाणे बाजूला पडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठीची सोडवणूक कोणता उमेदवार करणार, याबाबत त्यांच्या चेहऱ्यावर सांशकतेचे भाव असल्याचे दिसून आले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पावसाने बरसून विविध सभा, रॅलींवर परिणाम केला. त्यामुळे वक्त्यांची भाषणे मनसोक्त ऐकता न आल्याने काही ठिकाणी भ्रमनिरास झाल्याचे चित्र होते.
विधानसभा मतदारसंघांमधील महत्त्वाच्या लढती
अलिबाग, उरण या मतदारसंघामध्ये शेकापची टक्कर शिवसेनेच्या उमेदवारांसोबत आहे, तर पेण आणि पनवेलमध्ये भाजपसोबत दोन हात करावे लागणार आहेत. कर्जत आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. तसेच महाड मतदारसंघामध्ये काँग्रेसलाही शिवसेनेच्याच उमेदवाराचा सामना करावा लागत आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
१श्रीवर्धन मतदारसंघामध्ये खासदार सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने खासदार तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
२अलिबागमध्ये शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे बंधू सुभाष पाटील यांना निवडणुकीत जिंकून आणायचे असल्याने त्यांच्यासाठी ही लढत महत्त्वपूर्ण आहे.
महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले यांची लढाई काँग्रेसचे माणिक जगताप यांच्यासोबत आहे. जगताप यांच्यासाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशीच आहे. उरणममध्ये भाजपचे बंडखोर महेश बालदी यांच्यामुळे शिवसेनेचे मनोहर भोईर यांना अडचण झाल्याने ते अडचणीवर कशी मात करतात, हे लवकरच कळणार आहे. त्याच वेळी शेकापचे विवेक पाटील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.