आरसीएफ शाळेच्या विद्यार्थ्यांना रजत पुरस्कार
By admin | Published: September 14, 2015 11:35 PM2015-09-14T23:35:55+5:302015-09-14T23:35:55+5:30
येथील आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता मंडळ चमूला मुंबई येथे झालेल्या २९ व्या गुणवत्ता मंडळ विभागीय अधिवेशनात रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अलिबाग : येथील आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता मंडळ चमूला मुंबई येथे झालेल्या २९ व्या गुणवत्ता मंडळ विभागीय अधिवेशनात रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत त्यांनी केलेल्या प्रस्तुतीकरणासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इयत्ता दहावीतील मिहीर देशमुख याच्या नेतृत्वाखालील या विद्यार्थी गुणवत्ता मंडळ चमूत मिताली देशमुख, पार्थ कवळे, आभा घारपुरे, आल्विन जेकब, श्रुती म्हात्रे, ओमकार हिरगुडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
गुणवत्ता मंडळ ही मूळ जपानी संकल्पना असून वस्तू आणि सेवांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या
प्रक्रि येत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तिचा प्रभावी वापर केला जातो. विशेषत: कारखान्यांच्या वेगवेगळ्या विभागात काम करणारे कर्मचारी छोटी छोटी गुणवत्ता मंडळे स्थापन करून संबंधित विभागातील समस्यांचे निराकरण करीत असतात. या गुणवत्ता मंडळांच्या वार्षिक अधिवेशनात समस्या निराकरणाचे प्रस्तुतीकरण करून विचारांचे आदानप्रदान करतात.
आरसीएफ थळ कारखान्यात देखील गुणवत्ता मंडळ चळवळ प्रभावीरीत्या कार्यरत असून यापासून प्रेरणा घेऊन आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी ‘दिल मांगे मोअर’ या नावाने एक गुणवत्ता मंडळ स्थापन केले होते. ‘विद्यार्थ्यांचे गुणवत्ता मंडळ’ या अभिनव कल्पनेस प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचे मनोबल वाढावे यादृष्टीने आरसीएफ व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन विध्यार्थ्यांच्या या गुणवत्ता मंडळास मुंबई विभागीय अधिवेशनात सहभागी होण्याकरिता पाठविले होते.
मुंबई विभागीय अधिवेशनात सहभागी २३५ गुणवत्ता मंडळात शालेय विद्यार्थ्यांचे हे एकमेव प्रस्तुतीकरण असल्याने आयोजकांनी उद्घाटन समारंभातच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना प्रस्तुतीकरणाची संधी दिली. समारंभास उपस्थित कॅम्लिनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम दांडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या या गुणवत्ता मंडळ संकल्पनेचे कौतुक करून शालेय विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नास दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आरसीएफ व्यवस्थापनाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी अखिल भारतीय गुणवत्ता मंडळ फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष दि. के. श्रीवास्तव, मुंबई विभागाचे अध्यक्ष के. बी. भारती आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)