विक्रमी पावसाने जिल्ह्यात परिस्थिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:41 AM2019-08-07T01:41:51+5:302019-08-07T01:42:27+5:30
वर्षभराचा पाऊस दोन महिन्यांतच बरसला; महाड तालुक्याला पुराचा वेढा; माणगावमध्ये पाणीच पाणी
दासगाव : गेले १२ दिवस महाडमध्ये सतत पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम दळणवळणावर तसेच बाजारपेठेमधील व्यवहारावर व खेडेपाड्यातील वाहतुकीवर झाला आहे. सध्या आठ दिवसांचे पुराचे पाणी महाडकरांची डोकेदुखी ठरली असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानामध्ये शेती पहिल्या क्रमांकावर येत आहे.
संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैपासून पावसाने कोकणात हजेरी लावली. यंदा पाऊस कशा प्रकारे लागतोय याची काळजी बळीराजाला लागली होती. दर वर्षाप्रमाणे पावसाचा बहर काढतो की नाही, याची चिंता महाडकरांना लागली असता २५ जुलैपासून महाडकरांवर जणू कहरच बरसवला. गेली १२ दिवस महाड तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या लागणाºया पावसामुळे काळ आणि सावित्री नदीने धोक्याची पातळी उलटण्यास सुरुवात केली. २ आॅगस्टपासून सतत लागणाºया पावसाने महाडकरांची झोपच उडवली. गेले पाच दिवस महाड तालुक्यातील बहुतेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आजही तालुक्यात दरडी आणि महाड बाजारपेठेत शिरणारे पाणी, पाण्याखाली गेलेली शेती, वाहतुकीला होणारे अडथळे, त्याचप्रमाणे व्यापारी, शेतकरी आणि वाहतूकदारांना बसणारा आर्थिक फटका अशा अनेक समस्यांना महाडकर नागरिकांना सामोरे जावे लागले आहे.
तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये गेले आठ दिवस पुराचे पाणी कायम शेतीत आहे. शेकडो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. लावणी झालेली शेती या पुराच्या पाण्यामुळे जवळपास गेल्यातच जमा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. आपली शेती गेल्यात जमा असल्याने शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. पाणी उतरल्यानंतर पंचनामे करून शासन त्यांना काय मदत देणार याकडे लक्ष लागले असले तरी या पुराच्या पाण्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
जनजीवन विस्कळीत
रायगड मार्ग, बिरवाडी, विन्हेरे, खाडीपट्टा महाड शहराला जोडलेले हे मुख्य भाग आहेत. दरदिवशी या विभागातून हजारो नागरिक शहरात खरेदी-विक्री, डॉक्टर आणि शासकीय कामांसाठी ये-जा करतात. मात्र, रायगड-महाड मार्गावर त्याचबरोबर गांधारी पुलावर आणि दादली पुलावर पाणी साचल्याने मुख्य रस्ते बंद पडले आहेत. मिनीडोअर तसेच एसटी महामार्ग आणि खासगी वाहनांची वाहतूक बंद झाली आहे.
माणगावमध्ये पावसाबरोबर वाढतेय नागरिकांची भीती
माणगाव : तालुक्यास पावसाने चांगलेच झोडपले असून नागरिक आता या मुसळधार पावसामुळे भयभीत झाले आहेत. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर रेपोली ते तळेगाव दरम्यान रस्त्यावर पाणी साचल्याने चालकांना या पाण्यातून गाडी काढणे मोठ्या जिकिरीचे झाले. तसेच गोरेगावमध्ये तीन घराच्या भिंती या अतिवृष्टीमुळे पडल्या.
गोरेगावमधील बाजारपेठेत केदार खुळे यांच्या घरची मागील भिंत कोसळली तसेच इंदू धर्मा केकाणे यांच्या घराचीही भिंत उन्मळून पडली. तसेच गोरेगावनजीक नागाव गावातील वसंत हाटे यांच्या घराची एक बाजू पडली. या सर्व घटनांमध्ये कोणतीच जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान झाले आहे.
सोमवारी थोडा विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा जोरदार बरसण्यास सुरुवात केल्याने माणगाव तालुक्यात माणगाव, गोरेगाव, लोणेर, मौर्बा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. सततच्या या पडणाºया पावसाने आता थांबावे, अशी प्रार्थना नागरिक करीत आहेत.
महामार्गावर परिणाम
महाड तालुक्यातून महाड औद्योगिक क्षेत्रात हजारो कामगार खेड्यापाड्यातून नोकरीसाठी जातात. मुख्य रस्त्यावर आलेले पाणी आणि बिरवाडी हद्दीतील महामार्गावर नडगाव येथे सतत कोसळणारी दरड यामुळे नोकरीनिमित्त जाणाºया कामगारांना देखील या पुराचा फटका बसला आहे. महाड तालुक्यातील गेले आठ दिवसांच्या पुराने महाडकरांचे किती मोठे नुकसान झाले, याची आकडेवारी नसली तरी शेतकरी, व्यापारी, वाहनचालक, खेडोपाड्यातील भाजीविक्रेते यांचा व्यवसाय बंद पडल्याने कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी महाड तालुक्यातील पूरस्थिती कायमच आहे.
भालगाव मिठागरमध्ये दरड कोसळली
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील भालगाव व मिठागर या दरम्यान दरड तसेच झाडे पडल्यामुळे वाहतूक बंद करण्यात करण्यात आली.दरड हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडत राहिल्यामुळे झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने जाम झाल्याने चिखल, माती रस्त्यावर पसरली होती. मोठी झाडे रस्त्यावर पडली. ठिकठिकाणी माती व झाडे दगड अशी पडझड पाहावयास मिळाली. काही ठिकाणी आणखी झाडे पडण्याच्या स्थितीत आहेत. ही दरड सायंकाळच्या दरम्यान कोसळल्याने शासकीय मदतकार्य मिळू शकले नाही. त्यामुळे एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
बाजारपेठ ठप्प
महाड तालुक्यातील १८० गावांचे मुख्य खरेदी-विक्री बाजारपेठ आहे. गेले आठ दिवस महाड शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे शहरात खरेदी-विक्रीसाठी येणाºयांची संख्या कमी झाली आहे. शहराला जोडणाºया मुख्य रस्त्यावरच पाणी आल्याने खेडोपाड्यातील नागरिकांनी येणे बंद केले आहे. गेले आठ दिवस बाजारपेठेतील सुकट गल्ली ते अनेक दुकानांमध्ये पाणी शिरत असल्याने बाजारपेठच ठप्प झाली आहे. यामुळे भाजीविक्रेते, मच्छीविक्रेते, किराणा दुकानदार, मेडिकल, अशा अनेक व्यापाºयांचे धंदे बंद पडल्याने यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
२०१८-१९ रोजीपर्यंत पडलेला पाऊस
पावसाळा सुरू झाल्यापासून (दोन महिन्यांत) ६ आॅगस्ट २०१८ रोजीपर्यंत सरासरी २३२६.९१ मि.मी. पाऊस पडला होता.
माथेरान ३५८४.५०
म्हसळा २९९६.७८
महाड २६४४.९०
कर्जत् २५९०.२९
माणगाव २५५६.००
तळा २५४१.२०
पेण २४६७.२५
पोलादपूर २३९०.८०
रोहे २२८८.००
खालापूर २२८१.३०
पनवेल २१९४.०२
उरण १९०३.५०
मुरुड १८८३.००
श्रीवर्धन १८१६.१०
अलिबाग १६७०.१०
सुधागड १४२२.८७
एकूण - ३७,२३०.६१
सरासरी- २३२६.९१
२०१९-२० रोजीपर्यंत पडलेला पाऊस
पावसाळा सुरू झाल्यापासून (दोन महिन्यांत) ६ आॅगस्ट २०१९ रोजीपर्यंत सरासरी ३२१३.१४ मि.मी. पाऊस पडला होता.
माथेरान ४६७३.६०
पेण ४२२९.६०
तळा ३९४२.००
पोलादपूर ३६९४.००
रोहे ३६४४
माणगाव ३५८१.०५
म्हसळा ३३०९.००
कर्जत ३२८६.४०
पनवेल ३११८.७८
खालापूर ३०४२.००
महाड ३०२९.००
सुधागड २८७४.००
श्रीवर्धन २५४१.००
मुरुड २५२६,००
उरण २११७.५०
अलिबाग १८०२.२८
एकूण - ५१,४१०.२१
सरासरी- ३२१३.१४
आकडेवारी मि.मीटरमध्ये