शिवसेनेची ताकद विरोधकांना विचार करण्यास भाग पाडणारी - अनंत गीते
By admin | Published: March 17, 2017 06:20 PM2017-03-17T18:20:23+5:302017-03-17T18:20:23+5:30
अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात शिवसेनेची उभी राहत असलेली ताकद विरोधकांना विचार करण्यास भाग पाडणारी आहे, असे विधान अनंत गीते यांनी केलंय.
Next
ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. 17- अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात शिवसेनेची उभी राहत असलेली ताकद विरोधकांना विचार करण्यास भाग पाडणारी आहे. त्याचबरोबर राजा केणी यांच्या नेतृत्वाने येथील राजकीय गणितांना पुन्हा मांडणी करावी लागत असताना शिवसेनेच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या राजा केणी यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी शिवसेना खंबिरपणे उभी असेल, असे विश्वास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी शिवजयंती निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात केले.
हेमनगर येथे सालाबादप्रमाणे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवाला प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 18 वर्षाची अखंड परांपरा असलेल्या शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था, हेमनगर यांनी आयोजीत केलेल्या शिवजयंती उत्सवास हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. या सर्वांच्या साक्षीने अनंत गीते यांनी शिवसेना पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी असेल, असे आश्वासित केले. यावेळी पुढे बोलताना अनंत गीते यांनी सांगितले की, शिवसेना हा तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या हिताला येथे प्राधान्य दिले जाते, असे सांगितले.
हजारो शिवभक्तांची उपस्थिती
बुधवारी आयोजित मुख्य कार्यक्रमानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या मार्गदर्शनासाठी हजारो शिवभक्त उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. या सर्वांच्या भाषणांमुळे हेमनगरमधील वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते.
स्वागत कमानीचे उद्घाटन
हेमनगर येथे उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गावाच्या प्रवेशद्वारावर ही कमान उभारण्यात आली असून ही कमान शिवसेनेच्या माध्यमातून राजा केणी यांनी उभारली आहे. या कमानीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादुस, डी महेशचे खास आकर्षण
शिवजयंती उत्सवानिमित्ताने रात्री 8 वाजता आगरी, कोळी बांधवांना खास आषर्कण असलेल्या दादुस, डि महेश यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक बहारदार प्रयोगाने रसिकांची मने जिंकली. कोळीनृत्य, लावणीनृत्य, लोकनृत्याने हा कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. या कार्यक्रमाची रंगत उतरोत्तर वाढतच गेली. शिवजल्लोष या मुंबईतील कालाकारांनी सादर केलेल्या ऑक्रेस्टाला रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली.
छत्रपतींच्या जयघोषात भव्य मिरवणूक
सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीला सुरुवाला झाली. या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने पोयनाड परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते. या शिवप्रेमींच्या उत्साहाने येथील परिसराला भगवी झळाली आली होती. ढोल, ताशे आणि पारंपरिक वेषभूषेत हे शिवप्रेमी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
शिवनेरी ग्रुपतर्फे गुणवंताचा सत्कार
हेमनगरमधील गुणवंताचा यावेळी भव्य सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. यामध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, क्रीडाक्षेत्रात नाव कमावलेल्या व्यक्ती, समाजात नाव कमावलेल्या व्यक्ती, प्रतिष्ठीत नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार उपस्थित पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला.