पोयनाड दरोड्यातील सहा अटकेत
By Admin | Published: September 29, 2015 01:23 AM2015-09-29T01:23:50+5:302015-09-29T01:23:50+5:30
पोयनाडमधील सुरभी ज्वेलर्सवर २६ आॅगस्टला पडलेल्या दरोडा प्रकरणी रायगड जिल्हा पोलिसांच्या विशेष पोलीस तपास पथकाने आतापर्यंत एकूण सहा दरोडेखोरांना अटक करण्यात यश मिळवले आहे
अलिबाग : पोयनाडमधील सुरभी ज्वेलर्सवर २६ आॅगस्टला पडलेल्या दरोडा प्रकरणी रायगड जिल्हा पोलिसांच्या विशेष पोलीस तपास पथकाने आतापर्यंत एकूण सहा दरोडेखोरांना अटक करण्यात यश मिळवले आहे. या दरोडेखोरांच्या टोळीचा अटक करण्यात आलेला म्होरक्या हा मुंबईतील कुप्रसिद्ध याकुब चिकना गँगचा हस्तक असून त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती. तसेच त्याच्याविरुद्ध सानपाडा, खारघर व कल्याण पोलीस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्यामध्ये दरोडेखोराच्या या टोळीचा ५५ वर्षीय म्होरक्या हा मूळ चेन्नईतील रहिवासी आहे. तर उर्वरित पाच जणांमध्ये एक २७ वर्षीय श्रीगांव (पोयनाड),एक २७ वर्षीय विक्रोळी (प.) मुंबई, एक ४५ वर्षीय पवई ओर रोड मुंबई, एक ३२ वर्षीय विक्रोळी मुंबई तर एक २४ वर्षीय कुर्ला पश्चिम येथील रहिवासी असल्याचे हक यांनी सांगितले. या दरोड्याच्या तपासाच्या निमित्ताने गुन्हेगारांची आंतरराष्ट्रीय टोळी उजेडात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन पोलीस अधीक्षक हक म्हणाले, सुरभी ज्वेलर्स या दुकानामध्ये जावून चॉपर व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून फिर्यादीच्या भावास जखमी करुन दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, दागिन्यांचे ट्रे व रोख रक्कम असा एकूण ८९ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर, त्यात ३ जिवंत काडतुसे, एक लोखंडी चॉपर,एक प्लॅस्टिकची चिकटपट्टी बंडल, एक छोटी कापडी सेलोटेप, एक भगव्या रंगाची साडीची पट्टी, एक छोटा फोल्डिंगचा चाकू अशी हत्यारे दरोडेखोरांकडून जप्त करण्यात आली आहेत.
आरोपी नं. १ यास गेल्या २७ आॅगस्टला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी तर त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी क्र. २ व ३ ला २० सप्टेंबरला अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. आरोपी नं. ४, ५, ६ यांना २६ सप्टेंबरला अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आ.नं. ५ व ६ यांना ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
दरोडेखोरांकडून पहिल्या टप्प्यात त्यांच्या गाडीतून ८५.५७ ग्रॅम वजनाचे २ लाख २१ हजार ८५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. दुसऱ्या टप्प्यातील तपासात ६४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे १६ लाख १८ हजार ६७५ रुपये किमतीचे दागिने आणि एक सिल्व्हर रंगाची सँट्रो कार, एक गावठी बनावटीचे ३ जिवंत काडतुसांसह रिव्हॉल्वर आणि एक महिंद्रा झायलो ही पोयनाडमधूनच चोरलेली गाडी जप्त केली आहे.