मयुर तांबडे
पनवेल : पनवेलमधील अजिवली गावाजवळून जानेवारी २०१९ मध्ये सहा बांगलादेशी नागरिकांनाअटक केली होती. त्या सर्वांची लवकरच बांगलादेशला रवानगी केली जाणार आहे. पनवेलमधील शेडुंग व अजिवली गाव येथे बांगलादेशी वास्तव्य करत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक व्ही. खेडकर यांच्या पथकाने शेडुंगगाव विल्फ्रेड हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या डोंगर पायथ्याजवळून व अजिवली गावातून सहा बांगलादेशींनाअटक केली होती. त्यांच्याकडून चार मोबाइल व रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.
जाकीर मौजूर शेख (४०, नेरे), नजमुल इमान शेख (२९, कामोठे), शोबुज शिराज सरदर (२९, बेलापूर), अलमगीर नूर मोहम्मद शेख (२८, नेरे), यासीन अराफात शेख (२०, पारगाव), हबीब मलिक शेख (३५, कोपरा) अशी या बांगलादेशींची नावे आहेत. त्यांच्यावर पारपत्र अधिनियम सन १९५० चे कलम ३ (अ), ६ (अ), परदेसी नागरिक अधिनियम १९४६ चे कलम ३, १४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती. त्यांची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात त्यांची शिक्षा संपली असून, लवकरच त्यांना बांगलादेशला पाठवण्यात येणार आहे.पोलिसांनी विशेष शाखेला रिपोर्ट पाठवला असून, तेथून तो अहवाल गृह मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर बॉर्डर सीमेवर संदेश जातो व बॉर्डरचे पत्र आल्यानंतर त्यानुसार बॉर्डर निश्चित केली जाते व गावानुसार त्यांना बांगलादेशला सोडण्यात येते. या सहा जणांना बांगलादेशला सोडण्यात येणार आहे.