मावळ मतदारसंघात आचारसंहिता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सहा भरारी पथके
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 09:36 PM2024-03-16T21:36:25+5:302024-03-16T21:37:16+5:30
पोस्टर्स, बॅनर्स तत्काळ हटविण्याची सुरुवात : राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी गतवर्षीपेक्षा १५ दिवसांचा अधिक कालावधी.
मधुकर ठाकूर, उरण : लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक शनिवारी जाहीर झाला आहे.महाराष्टातील मावळ लोकसभा मतदारसंघात १९ मे रोजी मतदान होणार आहे.त्यामुळे आजपासून लागू झालेल्या आचारसंहिता भंग होणार नाही या दृष्टीने मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या उरण, पनवेल, खालापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघात आतापासूनच जोरदार कारवाईला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, खालापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याच्या दृष्टीने या क्षणापासुनच अंमलबजावणी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.उरण, पनवेल, खालापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन -दोन अशी सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.या पथकांकडून तीनही विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे जाहिरातींचे बॅनर्स, पोस्टर्स तत्काळ हटविण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.विविध राजकीय पक्षांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सर्व्हेक्षण करून त्याचे व्हिडिओव्दारे चित्रीकरण करण्यासाठीही पथक तयार करण्यात आली आहेत.शासकीय विश्रामगृहात राजकीय वापर आणि राजकीय पक्षांच्या नेते, पुढारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रवेश बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.त्याचबरोबर सर्वच सरकारी वाहने राजकीय वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.आचारसंहितेचे
अंमलबजावणी काटेकोरपणे
करण्यासाठी व्हीव्हीटी यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.आचारसंहितेच्या तक्रारींची दखल घेऊन तत्काळ निवारण करण्यासाठी विविध मतदार संघातील भरारी पथक तैनात करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी दिली.
मावळ लोकसभेची मागील निवडणूक २९ एप्रिल २०१९ रोजी पार पडली होती.यावेळी मावळ लोकसभा निवडणूक १३ मे २०२४ रोजी जाहीर झाली आहे.यामुळे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा मावळ लोकसभा मतदारसंघात १५ दिवसांचा कालावधी अधिक मिळणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरण तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी दिली.