पनवेल : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून रायगड जिल्ह्यातून काँग्रेसच्या सात विधानसभा मतदारसंघांतून जवळपास २५ जणांच्या मुलाखती प्रदेश काँग्रेसच्या निरीक्षकांनी पनवेल येथे गुरुवारी घेतल्या. रामहरी रूपनवर, सुरेश कुºहाडे आणि माजी आमदार तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सात विधानसभेसाठी
पनवेल विधानसभा मतदारसंघांतून कांतीलाल कडू, हेमराज म्हात्रे, उरणमधून श्रुती श्याम म्हात्रे, डॉ. मनीष पाटील, बाळासाहेब म्हात्रे, अभिजित पाटील, जनार्दन जोशी, महेंद्र तुकाराम घरत, जनार्दन भोईर, रेखा घरत, अशोक भाऊ मुंडे, नंदा राजेंद्र म्हात्रे (पेण), चंद्रकांत पांडुरंग पाटील (पेण), प्रवीण मधुकर ठाकूर (अलिबाग), राजेंद्र मधुकर ठाकूर (अलिबाग), श्रद्धा महेश ठाकूर (अलिबाग), ज्ञानदेव मारुती पवार (श्रीवर्धन), मौलाना डॉ. नानिश नईम लांबे (श्रीवर्धन), शब्बीर हुसैन शैख (कर्जत), दफेदार (पेण) यांच्यासह काहींनी मुलाखती दिल्या.
ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅड. श्रद्धा ठाकूर, पनवेल काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील, तालुकाध्यक्ष महादेव कटेकर, प्रवीण कांबळे, आदित्य अरविंद सावळेकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रायगडमध्ये काँग्रेसची राष्ट्रवादी-शेकापसोबत महाआघाडी आहे. सात विधानसभा मतदारसंघांत नेमक्या किती जागा काँग्रेस आपल्याकडे ठेवणार, याबाबत उत्सुकता लागून आहे. इतर पक्षासोबत आघाडी झाल्यास अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरणार असल्याने नाराजांची मनधरणी काँग्रेसला करावी लागणार आहे.