पाली : सुधागड तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पाली येथील भाग्यश्री प्लाझा या अपार्टमेंटमध्ये एकाच रात्री तब्बल सहा घरे फोडण्यात आली. तालुक्यात वारंवार होणाऱ्या या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भाग्यश्री प्लाझा येथे २५ ते २६ जानेवारी दरम्यान चोरट्यांनी इमारतीचा आवारात घुसून डी विंग १०५ मध्ये राहणारे प्रमोद ठोंबरे, वसंत टाकलेकर, नितीन साळवी, ए विंग मध्ये राहणारे चंद्रकांत शिंदे तसेच इमारतीचे कार्यालय एकाच वेळी फोडले. यामध्ये केवळ प्रमोद ठोंबरे यांच्या घरामधून ३८ हजार रोख रक्कम व दोन ग्रॅम सोन्याचे कानातील रिंग चोरले तसेच इतर पाच ठिकाणाहून चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. ही सर्वच घरे बंद होती. चोरट्यांना अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून ही चोरी केल्याचे निदर्शनास येत आहे.या इमारतीमध्ये चोविस तास दोन रखवालदार असताना देखील चोरटे चोरी करून पोबारा करण्यात यशस्वी झाले. पाली येथील भाग्यश्री प्लाझा या इमारतीमध्ये तालुका पोलीस निरीक्षक, तालुका तहसीलदार, तलाठी कोतवाल, राजकीय पक्षाचे तालुका अध्यक्ष तसेच पत्रकार असे प्रतिष्ठित नागरिक राहतात. या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)
पाली येथे एकाच रात्रीत सहा घरफोड्या
By admin | Published: January 28, 2017 3:00 AM