सहा लाख रहिवासी वाऱ्यावर
By admin | Published: September 25, 2015 02:24 AM2015-09-25T02:24:27+5:302015-09-25T02:24:27+5:30
सिडकोेने पनवेल तालुक्यातील खारघर ते तळोजापर्यंतचा परिसर विकसित केला. या ठिकाणी ६ लाख पेक्षा जास्त नागरिक राहण्यासाठी आले आहेत.
वैभव गायकर, पनवेल
सिडकोेने पनवेल तालुक्यातील खारघर ते तळोजापर्यंतचा परिसर विकसित केला. या ठिकाणी ६ लाख पेक्षा जास्त नागरिक राहण्यासाठी आले आहेत. परंतु या नागरिकांना अत्यावश्यक सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. उद्यान, मैदान, मार्केट, बसडेपो, रिक्षा स्टँड, समाजमंदिर यासारख्या सुविधाही नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होवू लागली आहे.
मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालुक्यामधील ९५ गावांमधील जमीन संपादित केली. प्रकल्पग्रस्तांची १७ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेवून त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर वसविण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. सिडकोने पहिल्यांदा बेलापूर ते ऐरोलीपर्यंतचा परिसर विकसित केला. तेथे प्रत्येक सेक्टरमध्ये उद्यान, मैदान, मार्केट,समाजमंदिर, शाळा यासाठी भूखंड राखून ठेवले. परंतु पनवेल तालुक्याचा विकास करताना मात्र नियोजनामध्ये प्रचंड त्रुटी ठेवल्या आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकमत कार्यालयास भेट दिली असताना या परिसरातील प्रश्नांवर लक्ष वेधले. खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे व उलवे परिसराचा विकास करण्यात आला आहे. मूळ गावठाण व विकसित नोडची लोकसंख्या ६ लाखपेक्षा जास्त झाली आहे. सिडकोने नागरिकांना भरमसाट आश्वासने दिली होती. परंतु त्यांची पूर्तता करण्यात आली नाही. सिडकोने सेक्टरनिहाय चांगले मैदान व उद्यान विकसित केलेले नाही. एकही सुनियोजित मार्केट बांधलेले नाही. खारघर ते पनवेलपर्यंत फक्त एकच बस डेपो आहे. रेल्वे स्टेशन वगळता इतर ठिकाणी नियोजित रिक्षा व टॅक्सी स्टँडही नाही.
सिडकोने नागरिकांच्या करमणुकीसाठी तालुक्यामध्ये एकही नाट्यगृह उभारलेले नाही. वाहनतळासाठी जागा ठेवलेली नाही. समाजमंदिरांचा अभाव आहे. धार्मिक स्थळांसाठी जागा नाही. या परिसरात ६ लाखपेक्षा जास्त नागरिक रहात आहेत.