वामणे रेल्वे स्थानकावर सहा प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 05:33 AM2020-01-29T05:33:30+5:302020-01-29T05:33:47+5:30
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे.
- सिकंदर अनवारे
दासगाव : कोकण रेल्वेच्या वामणे रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री रेल्वेतून उतरणारे सहा प्रवासी खाली पडले आणि काही सेकंदात गाडी सुरू झाली. मात्र, या पडलेल्या प्रवाशांनी एकमेकाला आधार देत बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, या धावपळीत यातील काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. जुना प्लॅटफॉर्म काढून टाकल्याने आणि क्षणात रेल्वे सुरू झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. यातील नवे प्लॅटफॉर्म हे कमी उंचीचे आहेत. याला महाड तालुक्यातीलवामने परिसरातील नागरिकांनी यापूर्वी विरोध केला आहे. वामने रेल्वे स्थानकातील जुना प्लॅटफॉर्मही या कामात काढून टाकण्यात आला आहे. यामुळे रेल्वेतून जमिनीवर उतरावे लागत आहे. वामणे रेल्वे स्थानकातील जुन्या प्लॅटफॉर्मवर सोमवारी रात्री ९:१५ वाजता दादर-रत्नागिरी ही गाडी येऊन थांबली. गाडी थांबताच यातील एका डब्यातून १४ प्रवासी उतरणारे होते. जुना प्लॅटफॉर्म हाही कमी उंचीचा असल्याने शिडीवरून उतरताना प्रवाशांना उशीर झाला. काही जण खाली उतरले तर काही प्रवासी डब्यात असतानाच रेल्वे सुरू झाली. यामुळे डब्यातील प्रवाशांनी उड्या टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे यातील पाच जण खाली पडले. खाली पडलेल्या प्रवाशांनी एकमेकाला आधार देत बाहेर काढले. मात्र, या धावपळीत ते जखमी झाले आहेत.
जखमी प्रवाशांमध्ये दत्ताराम सखाराम बोटेकर, दीपाली दत्ताराम बोटेकर, सुजाता गजानन चिविलकर (रा. सापे), नरेंद्र विठोबा रेशीम (रा. शिरगाव), श्रद्धा शिगवण-तेलंगे, वेदान्त शिगवण (११) अशा सहा जणांचा समावेश आहे. या वेळी एकच गोंधळ झाल्याने कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समिती अध्यक्ष मन्सूर देशमुख, वामने सरपंच प्रवीण साळवी, ग्रामस्थ फौजान देशमुख, फाईक देशमुख, प्रकाश जंगम, मंगेश निर्मल हे तत्काळ दाखल झाले. यातील जखमींना तत्काळ मदत केली. रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला मन्सूर देशमुख यांनी घडला प्रकार तत्काळ दूरध्वनीवरून कळवला. या ठिकाणी यापूर्वीदेखील अशाच प्रकारे दोन प्रवासी जखमी झाले होते. या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे मन्सूर देशमुख यांनी सांगितले.
दुपदरीकरण आणि क्रॉसिंगचे काम सुरू
वामणे रेल्वे स्थानकाचे दुपदरीकरण आणि क्रॉसिंगचे काम सुरू आहे. जुना प्लॅटफॉर्म काढून टाकण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना उतरण्यासाठी मातीचा तात्पुरता प्लॅटफॉर्म तयार केला आहे.
यामुळे रेल्वेमधून शिडीने खाली उतरावे लागत आहे. यामुळे वयोवृद्ध महिला, पुरुष आणि मुलांना उतरताना कसरत करावी लागत आहे. यामुळे असे अपघात होत असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. नवीन होणाऱ्या प्लॅटफॉर्मची आणि सध्या केलेल्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवली जावी, अशी मागणीही समितीमार्फत करण्यात आली आहे.
वामणे रेल्वे स्थानकावर होत असलेला नवीन प्लॅटफॉर्म हाही कमी उंचीचा आहे. उंची वाढवण्याची मागणी यापूर्वीच आम्ही केली आहे. सोमवारी रात्री हा अपघात जुना प्लॅटफॉर्म काढून टाकल्याने शिडीने उतरताना झाला. याबाबत रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी.
- मन्सूर देशमुख, अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समिती
घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून मिळाली. त्या ठिकाणी होणारी गैरसोय आणि होणारे अपघात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे.
- किसन बिद्री, अभियंता,
कोकण रेल्वे, रत्नागिरी
रेल्वेतून उतरत असताना एक मिनिटाहून कमी वेळच रेल्वे थांबली. रेल्वेच्या शिडीच्या पायरीने जमिनीवर उतरत असताना रेल्वे सुरू झाली. यामुळे घाबरलेल्या आमच्यातील काही जणांनी खाली उड्या मारल्या. यामुळे काही जण जखमी झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या कामामुळे या ठिकाणी प्लॅटफॉर्मच नाही.
- दत्ताराम गोठेकर, प्रवासी