राजेश भाेस्तेकर
अलिबाग : बाहेर मुसळधार पाऊस, कुटुंब गाढ झोपेत... रात्री साडेबारा वाजताची वेळ... आणि अचानक घराचा वासा अंगावर पडला.... काय झाले कळले नाही... सारे कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली... त्याही परिस्थितीत हिंमत करून उठलो... दुसऱ्या खोलीत असलेले आई-वडीलही ढिगाऱ्याखाली... बाहेर पडण्यासाठी छोटीशी जागा... त्यातून आई-वडील, पत्नी, मुलगी, भाऊ आणि मी कसेतरी बाहेर पडलो... मात्र, दुसरा भाऊ पूर्ण ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याने त्याला वाचविणे शक्य झाले नाही.... स्वतःवर ओढवलेला हा प्रसंग सांगताना मोहन सुतराम पारधी यांना भावना अनावर झाल्या.
मोहन सुतराम पारधी, तुकाराम पारधी (वडील), दुर्गी तुकाराम पारधी (आई), तुळशी मोहन पारधी (पत्नी), भानुश्री पारधी (मुलगी), रवींद्र तुकाराम पारधी आणि सुदान तुकाराम पारधी (दोन्ही भाऊ) हे पारधी कुटुंब इर्शाळवाडीत राहत होते. तीन खोल्यांचे भव्य घर दरड दुर्घटनेत गाडले गेले. मोलमजुरी आणि शेती करून पारधी कुटुंब गुजराण करीत होते. पण, गुरुवारची मध्यरात्र त्यांच्यासाठी काळ घेऊन आली. दैव बलवत्तर असल्याने सहा जण दरड दुर्घटनेतून सुखरूप बाहेर पडले. मात्र, त्यांचा भाऊ सुदान याला या दुर्घटनेत काळाने हिरावून घेतले.
मोहन यांनी हिमतीने आपल्या कुटुंबाला वाचवले. मात्र, भावाला वाचवू शकले नाहीत, हे दुःख त्यांच्या मनात आहे. बाहेर पडल्यानंतर काळोखात त्यांनी डोंगर उतरून नानवली गावात धाव घेतली. सध्या हे कुटुंब आपल्या नातेवाइकांकडे राहत आहे. या दुर्घटनेत जे गेले, ते सोबती पुन्हा मिळणार नाहीत, हे दुःखही वाचणाऱ्यांच्या मनात खोलवर आहे.
दरड दुर्घटनेची माहिती देताना पारधी कुटुंबाच्या एका डोळ्यात अश्रू होते. त्याचवेळी कुटुंबातील सहा जण वाचल्याच्या भावनाही होत्या. कष्टाने बांधलेले घर उद्ध्वस्त झाले. पुन्हा नव्याने संसार उभा राहील; पण, ज्यांना गमावले त्यांचे दुःख कायमच मनात राहील.