अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरसच्या बाबतीत प्रशासन अगदी सजग राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु जिल्हा सरकारी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षामध्ये सहा व्हेंटिलेटरची कमतरता आहे, त्याचप्रमाणे न्यूझोफॅरेजीएस नमुने घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरच नाही, तसेच एका १०८ रुग्णवाहिकेमधील लाइफ सपोर्ट बंद आहे. त्यामुळे प्रशासनाची तयारी कुचकामी ठरण्याची शक्यता असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पनवेल तालुक्यामध्ये इराणहून आलेल्या चार नागरिकांना कोरोना संशयित म्हणून पाहिल्याने राज्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र त्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे निदान आरोग्य विभागाने केल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांनीच दिली होती तर दुसरीकडे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवळी यांनी त्याचा इन्कार केला. त्यामुळे चांगलाच गदारोळ झाला होता. त्यानंतर रात्री उशिरा निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी प्रशासनाची बाजू सावरण्यासाठी पत्रकार परिषद घेत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा प्रशासन कोरोनाच्या बाबतीमध्ये गंभीर आहे. यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत असल्याचेही बैनाडे यांनी स्पष्ट केले. खबरदारीचा उपाय म्हणून परदेशी नागरिकांनी आमच्याकडे येऊ नका, असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली. त्याचप्रमाणे जेएसडब्ल्यू-साळाव, इंडो एनर्जी आणि दिघी पोर्ट या ठिकाणी तात्पुरती १२ स्क्रीनिंग सेंटर उभारण्यात आली आहेत. या स्क्रीनिंग सेंटरवर फक्त ताप मोजण्याचे थर्मामीटर ठेवण्यात येणार आहे. संबंधितांना ताप आला असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला सरकारी रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. मात्र आरोग्य विभागाकडे डॉक्टरांची कमतरता आहे, तसेच पुरेसे कर्मचारीवर्ग नियमित सेवा देण्यासाठी उपलब्ध नसताना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मनुष्यबळ कोठून आणणार, असा प्रश्न आहे.1)सरकारी रुग्णालयामध्ये निर्माण करण्यात आलेल्या कोरोना विलीगीकरण कक्षामध्ये सात बेड उभारण्यात आले आहेत. परंतु सध्या तेथे एकच व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे. तेथे सहा व्हेंटिलेटरची कमतरता आहे.
2)त्याचप्रमाणे कोरोनाच्या संशयिताचे न्यूझोफॅरेजीएस नमुने तपासण्यासाठी कान, नाक आणि घशाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असताना तेही येथे उपलब्ध नाहीत. जिल्हा सरकारी रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका आहेत, मात्र यातील काही रुग्णवाहिकांमध्ये लाइफ सपोर्टसाठी असणारी उपकरणे नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.
3)प्रशासनाने १५ तालुक्यांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या अखत्यारीत असणाºया प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेमक्या कोणत्या सुविधा आहेत, याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने नेमकी कोणती तयारी केली आहे, हाच खरा सवाल उपस्थित केला जात आहे.आपल्याकडे कोरोना संदर्भातील कोणतीच गंभीर परिस्थिती नाही. परंतु उपाययोजना म्हणून तयारी करण्यात आली आहे. व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने खासगी रुग्णालयाकडील व्हेंटिलेटरची मागणी करण्यात आली आहे. पनवेलमध्ये ५२ व्हेंटिलेटरची व्यवस्था झाली आहे. पैकी १० व्हेंटिलेटर हे अलिबागला आणले जाणार आहेत. तसेच पनवेल, अलिबाग आणि माणगाव अशी तीन स्वतंत्र सेंटर बनवण्यात आली आहेत. जिल्ह्यात २२ रुग्णवाहिका आहेत, पैकी चारमध्ये लाइफ सपोर्ट सिस्टीम आहे. त्यातील एका रुग्णावाहिकेतील बंद असलेल्या लाइफ सपोर्ट यंत्राची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. - डॉ. प्रमोद गवई, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड