दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट
By निखिल म्हात्रे | Published: October 23, 2022 01:30 PM2022-10-23T13:30:11+5:302022-10-23T13:41:39+5:30
लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - उद्यावर दिवाळी आली असताना अद्याप नोकरदार वर्गाचा पगार झाला नसल्याने खरेदीदारांमध्ये आज मंदीचे सावट ...
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग - उद्यावर दिवाळी आली असताना अद्याप नोकरदार वर्गाचा पगार झाला नसल्याने खरेदीदारांमध्ये आज मंदीचे सावट दिसून येत आहे. त्यातच यावर्षी प्रत्येक वस्तुंच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली असल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री बसली आहे. त्यामुळे बाजारपेठा जरी सजल्या-असल्या तरी ग्राहक मात्र वस्तु खरेदी करण्यासाठी फिरकत ही नाहीत.
यंदा भाववाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठय़ा प्रमाणावर कात्री बसत आहे. बाजारात साध्या, रंगकाम न केलेल्या वेगवेगळ्या आकारातील पणत्या 8 रुपयांपासून ते 70 रुपयांपर्यंत प्रतिनग या भावाने बाजारात उपलब्ध आहेत. रंगकाम केलेल्या आकर्षक व कुंदनजडीत पणत्या 80 रुपयांपासून 170 रुपयांपर्यंत प्रतिडझन या भावाने विक्री होत आहे. रांगोळ्यांचे स्टीकर, स्वस्तिक व लक्ष्मीची पावले 10 ते 30 रुपयांच्या घरात उपलब्ध आहेत.
रांगोळ्यांचे ठसे, रंग भरण्यासाठी जाळीची झाकणे असलेल्या डब्या व रोल यांनाही चांगली मागणी आहे. त्याचबरोबर दारावरील तोरण आणि झुंबरांचेहीविविध प्रकार बाजारात पाहावयास मिळत आहेत. विविध रंग आणि रांगोळ्यांमुळे बाजारपेठा अधिकच खुलून दिसत आहेत. रंग 5 रुपये 50 ग्रॅम या किमतीमध्ये तर रांगोळी मिक्स कलरच्या डब्या यंदा 10 रुपये किमतीमध्ये उपलब्ध आहेत. रांगोळी पुस्तक 10 ते 50 रुपयांपर्यंत असून घरगुती उटणे 5 रुपये एक पॅकेट बाजारात उपलब्ध आहेत.
पावसाळी कंदील
यंदा बाजारात नवीन विजेच्या सिंगल पणत्या दाखल झाल्या आहेत, तर रंगांचे विविध प्रकारही एका डब्ब्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे पाऊस अधूनमधून येत असल्याने बांबूच्या आणि कापडाच्या कंदिलाला मोठय़ा प्रमाणावर
मागणी असल्याचे दिसून आले.
वस्तू महाग -
यंदा वस्तूंच्या किमतीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. जीएसटी, नोटबंदी यांचा फटका यंदा बाजारपेठांवर बसल्याने त्यांची कस भरून काढण्यासाठी किमतीमध्ये वाढ झाली आहे, परंतु किमती वाढल्या असल्या तरीही विविध वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचे
सांगत त्या तुलनेत कपडय़ांच्या दुकानात फार गर्दी नसल्याने व्यापारी चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय बनावटीच्या वस्तूंना पसंती
यंदा बाजारपेठेचा 90 टक्के भाग हा भारतीय बनावटीच्या दिवाळीपयोगी वस्तूंनी आच्छादला आहे. चिनी बनावटीच्या मालावर बहिष्कार टाकत नागरिकांची भारतीय बनावटीच्या मालालाच पसंती दिली आहे.
रांगोळीच्या स्टिकरला मागणी
दिवाळी उत्सवाला बाजारामध्ये विविध वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यात स्टिकरमधील रांगोळी, उंबरठ्याचा पट्टा, तोरण अशा विविध वस्तूंची मागणी सुद्धा वाढली आहे. रांगोळीचे स्टिकर याची मागणी बाजारात मोठ्या रुपये. प्रमाणात होत आहे. या वस्तूंच्या दरातही दहा ते पंधरा टक्के भाव वाढ झाल्याचे व्यवसायिकांनी सांगितले आहे