नेरळ : कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी २१ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीसाठी कर्जत तहसील कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यात सावळागोंधळ असल्याचे दिसून येत आहे. मात्र जागरूक कार्यकर्ता आणि नागरिक यांनी आपला आक्षेप नोंदविल्यानंतर तहसील कार्यालयाने आपली चूक सुधारली आहे.कर्जत तालुक्यात वाढलेल्या लोकसंख्येमुळे १९९२ नंतर पुन्हा रायगड जिल्हा परिषदेसाठी सहा गट तयार झाले आहेत. कर्जत नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट कमी झाला होता. त्यामुळे आपोआप कर्जत पंचायत समितीचे दोन गण कमी झाले. २०१७ ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्याआधी कर्जत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने तयार केलेल्या सहा गटांच्या मतदार याद्या तालुक्यातील ग्रामस्थांना अवलोकन करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात ठेवल्या. जिल्हा परिषदेचे पाच गटांचे सहा गट तयार करण्याचे काम याच निवडणूक विभागाने केले होते. त्यात गट वाढल्याने २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील सर्व पाच गटांमध्ये समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती कमी होऊन त्यातून सहावा गट तयार झाला. त्यावेळी अख्खी ग्रामपंचायत लगतच्या गटात टाकली. ग्रामपंचायतीमधील एखादे गाव उचलून अन्य गटात टाकण्यास राज्य निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असल्याने त्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही. परंतु निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर होताच निवडणूक लढविण्याची तयारी करणारे इच्छुक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी कर्जत तहसील कार्यालयात गटाच्या मतदार याद्या पाहण्यास सुरु वात केली.भाजपाचे तालुका सरचिटणीस राजेश भगत हे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची यादी घेऊन त्यांची नावे मतदार यादीत शोधत होते. त्यांना स्वत:चे चिंचवली आणि शेजारचे वडवली गाव उमरोली जिल्हा परिषद गटात सापडले नाही. त्यांनी नेरळ आणि सावेळे गटाच्या मतदार याद्यांचा शोध घेतला असता ही दोन्ही गावे सावेळे गटाच्या मतदार यादीत सापडली. त्यांनी तक्र ार केल्यानंतर कर्जत तहसील कार्यालयाने चिंचवली आणि वडवली ही दोन्ही गावे उमरोली गटाच्या मतदार यादीत समाविष्ट करून मतदार यादी नव्याने बनवून घेतली. दुसरीकडे २० जानेवारी रोजी कर्जत तहसील कार्यालयात तहसीलदारांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी एक नागरिक नेरळ गटाची मतदार यादी तपासत असताना त्यांना नेरळ ग्रामपंचायतीमधील जुम्मापट्टी आणि धसवाडी येथील मतदारांची नावे उमरोली गटात टाकल्याचे त्यांचा शोध घेतला असता दिसून आले. त्याबाबत माहिती तहसीलदार अविनाश कोष्टी यांना दिली असता त्यांनी नायब तहसीलदार संजय भालेराव यांना माहिती घेण्यास सांगितले. भालेराव यांनी कोणताही बदल करता येणार नाही असे सांगितले. (वार्ताहर)
गटांच्या मतदार याद्यांचा सावळागोंधळ
By admin | Published: January 30, 2017 2:11 AM