जयंत धुळप, अलिबागमुक्तपणे खेळण्या-बागडण्याच्या कोवळ्या वयातच चेहऱ्यावरील हास्य हरविलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आणि पालकांपासून दुरावलेल्या, हरवलेल्या वा अपहरण केलेल्या बालकांना पुन्हा त्यांच्या आई-वडिलांची भेट घालून देण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागामार्फत १ जुलैपासून हाती घेतलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’या मोहिमेस रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. गेल्या २१ दिवसांत, हरवलेल्या नऊ बालकांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात रायगड पोलिसांना यश आल्याची माहिती रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार यांनी दिली आहे. ही नऊ बालके हरवली असल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या नव्हत्या, ही बालके सापडल्यावर त्यांच्या पालकांचा शोध पोलिसांनी घेऊन या बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जून २०१५ अखेर जिल्ह्यात एकूण ३२ बालके हरवली असल्याची नोंद झाली होती. त्यापैकी पाच मुलांचा शोध लागला असून त्यांनाही त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये लहान मुलांचा वापर करण्यात येत असल्याचे राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या निदर्शनास आले असून, यामध्ये बेवारस, बेपत्ता, रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या मुलांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. गेल्या १ जुलैपासून ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. हरवलेल्या आणि बेवारस सापडलेल्या मुलांची माहिती पोलिसांना देण्यासाठी जनसामान्यांनी सक्रिय योगदान दिल्यास ‘आॅपरेशन मुस्कान’ला खऱ्या अर्थाने मोठे बळ मिळू शकणार असल्याने नागरिकांचा सहभाग वाढणे पोलिसांना अपेक्षित आहे.बेवारस, बेपत्ता, रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या मुलांच्या समस्येचे विश्लेषण करताना बालक-पालक सुसकारात्मक अशा ‘चला मुलांना घडवू या’ या उपक्रमाचे प्रणेते ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ तथा राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ परिषदेचे कार्यकारिणी सदस्य डॉ.चंद्रशेखर दाभाडकर म्हणाले, मुलांच्या मनावरील पालकांच्या अपेक्षांचा ताण, परीक्षेतील यशापयशाचा ताण वाढत आहे. त्यांच्यातील वैफल्याची भावना, त्यांच्या मनातील मतप्रवाह हे जाणून घेण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न, पालकांनी वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधून जाणीवपूर्वक केले पाहिजेत. आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, ही विश्वासाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करून आत्मविश्वासाची पातळी वृद्धिंगत करण्याचे काम करणे आवश्यक असल्याचे डॉ.दाभाडकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात १४ पालकांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’
By admin | Published: July 22, 2015 3:24 AM