- मधुकर ठाकूर उरण : देशातील प्रमुख बंदर म्हणून ओळख असलेल्या जेएनपीटीच्या परिसराला तस्करांचा विळखा पडू लागला आहे. रक्तचंदन, सोने, सिगारेटसह इतर वस्तूंची तस्करी करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचे यापूर्वी केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. लॉकडाऊनच्या काळातही तस्करीचे प्रयत्न करण्यात आले होते; परंतु डीआरआयच्या सतर्कतेमुळे जवळपास १२ कोटी रुपयांच्या सिगारेट व ५ कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त करण्यात यश आले आहे.
हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये समुद्रमार्गे होणाºया तस्करीच्या कथानकावरून अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. चित्रपटात दिसणारा तस्करीचा थरार प्रत्यक्षातही सुरू असल्याचे जेएनपीटी परिसरात होणाºया कारवाईवरून स्पष्ट होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही तस्करी करणाºया टोळ्यांनी त्यांच्या कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.
१२ जूनला दुबईवरून खजुरांच्या बॉक्समधून सिगारेटची तस्करी करण्यात आल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे छापा मारून ३२ हजार ६४० बॉक्स जप्त करण्यात आले. त्यामध्ये जवळपास ७१ लाख ६१ हजार ६०० सिगारेटची पाकिटे आढळली. त्यांची किंमत जवळपास ११ कोटी ८८ लाख रु पये आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. १५ जूनला जेएनपीटीमार्गे रक्तचंदन शारजामध्ये निर्यात करण्याचा प्रयत्न सुरू होता. या माहितीच्या आधारे छापा मारून १३ टन रक्तचंदन जप्त करण्यात आले. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ५ कोटी २० लाख रुपये आहे. या गुन्ह्यामध्येही दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
जेएनपीटीमार्गे तस्करी होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही समुद्रमार्गे तस्करीचे अनेक प्रयत्न झाले आहेत. जुलै २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांनी पनवेल परिसरामध्ये छापा मारून तब्बल १३० किलो हेरॉईन जप्त केले होते. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत १३०० कोटी रुपये होती. वर्षभरातील ती सर्वांत मोठी कारवाई होती. याशिवाय या परिसरातून रक्तचंदनाचा साठा अनेक वेळा जप्त केला आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश व इतर ठिकाणांवरून रक्तचंदन जेएनपीटीमार्गे विदेशात पाठविण्यात येते.
चीन, मलेशिया, जपान, सिंगापूर व इतर अनेक देशांमध्ये रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. रक्तचंदनाचा औषधी गुणधर्म व त्यापासून सुबक आकर्षक वस्तूही बनविता येतात. एक किलो रक्तचंदनाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अडीच ते तीन हजार रुपये मिळत असल्याचे जाणकार सांगतात. रक्तचंदनाप्रमाणे सोन्याचीही तस्करी करण्याचे प्रयत्न झाले असून अनेक आरोपी डीआरआयच्या पथकाने गजाआड केले आहेत; परंतु अनेकवेळा तस्करीमधील मुख्य सूत्रधार सापडत नाहीत. तस्करीचा विळखा कायमस्वरूपी थांबविण्यासाठी या टोळ्यांच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून होत आहे.
तस्करी करणाऱ्यांवर डीआरआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. संशयित कंटेनरची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा त्यांच्याकडे असते. गुन्हेही त्यांच्याकडून दाखल करण्यात येत असून, आरोपी ठेवण्यासाठी काही वेळेस स्थानिक पोलीस स्टेशनचे सहकार्य घेतले जाते.- राजेंद्र चव्हाण, साहाय्यक पोलीस आयुक्त, न्हावा शेवा बंदर विभाग
रक्तचंदनाच्या तस्करीवर डीआरआय विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते. त्यांच्याकडे त्याविषयी यंत्रणा आहे. पूर्वी कारवाई केल्यानंतर जप्त केलेले रक्तचंदन वनविभागाच्या ताब्यात दिले जात होते. परंतु आता ते डीआरआयच्या कस्टडीतच ठेवले जात असून त्यांच्याकडूनच त्याची कायदेशीर विल्हेवाट लावली जाते.- नंदकिशोर कुंथे, साहाय्यक वनसंरक्षक अधिकारी