खालापूर : कंटेनरमधून परदेशात पाठविण्यात येत असलेल्या इंजिन आॅइलचे कार्टन्स हस्तगत करण्यात आले. ते कार्टन्स चोरून त्याची विक्री केली जाणार होती. या प्रकरणी खालापूर तालुक्यातील चौक येथील महेश चौधरी, गिरीश माळी, सागर देशमुख या स्थानिक तरुणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात सिलवासा येथील डेव्हाल आॅइल्स कारखान्यात उत्पादन झालेले इंजिन आॅइल कंटेनरमधून घाना देशात पाठविले जाते. ७ एप्रिल २०१८ रोजी सिलवासा गुजरात येथील डेव्हाल कारखान्यातून जेएनपीटीकडे माल घेऊन निघालेला कंटेनर आरोपी जलाल मोहम्मद त्याच्या साथीदारांनी रात्रीच्या वेळेस मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खालापूर हद्दीत नढाळ येथील गोडाऊनमध्ये आणून त्यातील ५,२५,६००/- रुपये किमतीचे इंजिन आॅइलचे कार्टन्सचा चोरून विक्री केली होती. यामध्ये गोडाउनचा सुरक्षारक्षक महेश चौधरी, चौक गावातील तारापूर येथे राहणारा गिरीश माळी आणि चोरीचा माल वाहतूक करण्यासाठी गाड्या पुरविणारा सागर देशमुख याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सुरक्षारक्षक महेश चौधरी, गिरीश माळी आणि सागर देशमुख या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी जलाल मोहम्मद आणि कंटेनर चालक नीलेश रायद फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.* खालापूर तालुक्यातील चौक हद्दीत हायवे लगत अनेक गोडाऊन आहेत. तेथे अनेक उद्योग चालत असतात. मात्र, तेलचोरीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर हे गोडाऊन संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत.* त्यामुळे आता सर्व गोडाऊनची नियमित तपासणी केली जाणार आहे. असे खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी पांढरपट्टे यांनी सांगितले.
खालापुरात आॅइलची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:19 AM