महाड : गेल्या दहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये सामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याबाबत प्रचंड अभाव असून हे ट्विटरवर चालणारे सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी केले. पक्षाच्या संघटनात्मक कोकण दौऱ्यावर जाताना शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आज १५ वर्षांनंतर प्रथमच राज्यात आणि केंद्रात विरोधी पक्ष म्हणून पक्षाला सामोरे जावे लागत असले तरी एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघर्ष करणार असल्याचे तटकरे यांनी सांगताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंधराशे रुपये नुकसानभरपाई देण्याची शासनाने केलेली घोषणा म्हणजे बळीराजाची क्रूर चेष्टा असल्याचा आरोप तटकरे यांनी केला. काही महापालिका हद्दीत एलबीटी रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांना बसणार आहे. याचा कुठलाही विचार राज्य शासनाने केला नाही. त्यामुळे महापालिकेला आपले स्वत:चे आर्थिक स्रोत गमवावे लागले आहे. अशा महापालिकांना निधी कसा उपलब्ध करुन देणार याबाबत राज्य शासनाने निर्णयात स्पष्टता केली नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. आर्थिक घोटाळाप्रकरणी आज अटक केलेल्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रमेश कदम यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार, याबाबत विचारणा केली असता कदम यांना पक्ष पाठीशी घालणार नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. कदम यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील प्रश्नांबाबत उपाययोजना करण्याची सरकारमध्ये धमकच नाही, अशी टीकाही तटकरे यांनी केली. (वार्ताहर)
हे तर टिष्ट्वटरवर चालणारे सरकार
By admin | Published: August 18, 2015 2:57 AM