सर्प संरक्षणासाठी सर्पमित्रांचे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:51 AM2017-07-26T01:51:04+5:302017-07-26T01:51:06+5:30

सापांचे मृत्यू, प्रसंगी नामशेष होत असलेल्या सापांच्या विविध जाती, गैरसमजामुळे मारले जाणारे साप विविध कारणास्तव जखमी होणारे साप या सर्व पार्श्वभूमीवर ‘स्नेक रेस्क्यू’ अर्थात सर्प संरक्षण ही अत्यंत आवश्यक बाब ठरत आहे.

Snake charmers protection for Snake | सर्प संरक्षणासाठी सर्पमित्रांचे सहकार्य

सर्प संरक्षणासाठी सर्पमित्रांचे सहकार्य

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी 
अलिबाग : सापांचे मृत्यू, प्रसंगी नामशेष होत असलेल्या सापांच्या विविध जाती, गैरसमजामुळे मारले जाणारे साप विविध कारणास्तव जखमी होणारे साप या सर्व पार्श्वभूमीवर ‘स्नेक रेस्क्यू’ अर्थात सर्प संरक्षण ही अत्यंत आवश्यक बाब ठरत आहे. यावर उपाय योजण्यासाठी  ‘स्नेक रेस्क्यू’ अर्थात सर्प संरक्षणाकरिता सापांना पकडण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी पुन्हा निसर्गात सोडून देण्याचे काम करण्यासाठी वन अधिकारी व त्यांच्या क्षेत्रातील सर्पमित्र यांचा समन्वय साधून राज्यातील पहिल्या चर्चासत्रांचे आयोजन आॅर्गनायझेशन फॉर वाइल्ड लाइफ स्टडीज (ओडब्ल्यूएलएस)च्या माध्यमातून रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. या चर्चासत्रांतील विचारमंथनांती सर्प संरक्षणविषयक एक महत्त्वाचे पुढचे पाऊल टाकले गेले असल्याची माहिती आॅर्गनायझेशन फॉर वाइल्ड लाइफ स्टडीज संस्थेचे अध्यक्ष गणेश मेहंदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. 
    यंदाच्या नागपंचमीचे या सर्पसंरक्षण मोहिमेच्या निमित्ताने आगळे औचित्य मानले जाणार आहे. सर्पमित्रांसाठी ‘मार्गदर्शक तत्त्वे व आचारसंहिता’ प्राथमिक मसुदा रायगड जिल्ह्यातील आॅर्गनायझेशन फॉर वाइल्ड लाइफ स्टडीज(ओडब्ल्यूएलएस)या संस्थेने तयार  के ला आहे.  तो मसुदा ठाणे वन विभागाचे मुख्य वनक्षेत्रपाल सुनील लिमये यांच्या माध्यमातून नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव)यांच्या सादर करण्यात आला आहे. याचाच पुढील टप्पा म्हणून ठाणे वन विभागात येणाºया पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील  वन अधिकारी व त्यांच्या क्षेत्रातील सर्पमित्र यांचा समन्वय साधून, माहितीचे आदान-प्रदान होणे याकरिता या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मेहंदळे यांनी यावेळी सांगितले. 
    प्राथमिक स्वरूपात सापांविषयी माहिती विषारी - बिनविषारी आणि निमविषारी, त्यांचा अधिवास याबाबत सर्प अभ्यासक व सर्पमित्र योगेश गुरव यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली. सर्प संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्पमित्रांना येणाºया अडचणी, वनखात्याला येणाºया अडचणी, स्वयंसेवी निसर्ग मित्र या अनुषंगाने सखोल चर्चा या चर्चासत्रात झाली.
सर्पमित्र ही संकल्पना महाराष्टÑात चांगलीच रुजली असून, राज्याच्या बहुतांश गावांमध्ये सर्पमित्र कार्यरत आहेत. साधारणत: तरुण वा किशोर वयातच एखाद्याचा सर्पमित्र बनण्याचा प्रवास चालू होतो. 
काळाच्या ओघात अनेक वेळा सोशल मीडिया व प्रसिद्धीच्या नादाने सापांशी खेळ करणे, स्टंटबाजी याकडे अनेकांचा कल झुकतो. या नादात थेट जीव गमवावा लागलेलीही अनेक उदाहरणे असल्याचे प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले.
या चर्चासत्राच्या वेळी रोहा उप वनसंरक्षक  ए.एस.सूर्यवंशी, अलिबाग सहायक वनसंरक्षक  एस.आर.ढगे,पनवेल सहायक वनसंरक्षक आर.के. खुपते, गिधाड संरक्षण मोहिमेचे प्रणेते व सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांच्याबरोबर अलिबाग, रोहा, मुरुड, श्रीवर्धन येथील वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सर्प संवर्धन, संरक्षण आणि याविषयी जनजागृतीमध्ये कार्यरत खोपोली, पनवेल, पाली-रोहा, महाड, मुंबई येथील सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.



आचारसंहिता सर्प बचाव व पुनर्वसनापुरतीच मर्यादित
१‘ओडब्ल्यूएलएस’च्या माध्यमातून सर्पमित्रांसाठी आचारसंहितेचा मसुदा तयार केला आहे. ही तत्त्वे व आचारसंहिता, यांची व्याप्ती अतिशय मर्यादित असून ती केवळ सर्प बचाव व पुनर्वसन यापुरतीच मर्यादित आहे. यामध्ये सर्प विष संकलन, प्रति सर्पविष औषधी निर्मिती किंवा सर्पविष अथवा अवयवांचा अवैध व्यापार याचा समावेश नाही. 
२वन्य जीव संरक्षण कायद्यात या सर्व बाबी समाविष्ट असून त्याच्या कलमान्वये प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) यांच्या अखत्यारीत कारवाई होऊ  शकते, असे मेहेंदळे यांनी सांगितले. 
३सर्प बचाव कार्यासाठी आदर्श आचारसंहिता तयार करणे, वन खात्याच्या स्थानिक कार्यालयांद्वारे सर्प बचाव कार्याचे नियमन करणे व स्थानिक पातळीवर जबाबदार सर्पमित्र घडवणे, विषारी व बिनविषारी सापांच्या पुनर्वसनासाठी धोरण निश्चित करणे, वन खात्याकडे सर्पमित्रांनी जमा करावयाच्या नोंदीसाठी अधिकृत मानक नमुना तयार करणे, 
४वन्यजीव विभागाद्वारे अ‍ॅन्ड्रॉईड व आयफोन अ‍ॅप्लिकेशन तयार करून त्याचाही वापर करणे, या नोदींमुळे राज्यभरातील सापांविषयी आकडेवारी तर जमा होईलच शिवाय सर्पमित्रांची जबाबदारी निश्चित करण्यास त्याची मदत होईल असा उद्देश या मागे असल्याचे त्यांनी मेहेंदळे यांनी सांगितले.



स्थानिक पातळीवर कायद्याच्या अंमलबजावणीत मर्यादा 
सामान्यत: सापांना माणूस प्रचंड घाबरतो, त्यामुळे जो कोणी या प्राण्याला हाताळण्यात प्रवीण असतो, तो साहजिकच जनसामान्यांत प्रसिद्ध होतो. 
या प्रसिद्धीमुळे बहुधा अशा सर्पमित्रांवर कडक कारवाई करून, वन्य जीव संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे अवघड जाते. 
अनेक वेळा, शासकीय यंत्रणेत सर्प हाताळणारे तज्ज्ञ नसल्यामुळे, ही यंत्रणा साप वाचविण्यासाठी सर्पमित्रांवर अवलंबून असते, त्यामुळेही स्थानिक पातळीवर कायद्याच्या अंमलबजावणीत मर्यादा येत असल्याचे मेहेंदळे यांनी सांगितले.

Web Title: Snake charmers protection for Snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.