उरण परिसरात सापांची दहशत वाढली; आठवडाभरात विषारी सर्पदंशाच्या सहा घटना उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 08:55 PM2023-12-12T20:55:19+5:302023-12-12T20:55:37+5:30
उरण परिसरातील जंगल, डोंगर -दऱ्या, दलदलीच्या जागा नष्ट झाल्या आहेत.परिणामी उरण परिसरात नागरी वस्तीत सापांचा वावर वाढला आहे.
- मधुकर ठाकूर
उरण : उरण परिसरात नागरी वस्तीत सापांचा वावर वाढला आहे.त्यामुळे सर्प दंशाच्या घटनेत ही वाढ झाली असून आठवडाभरात सहा घटना उघडकीस आल्या आहेत.सुदैवाने सर्पमित्रांच्या मदतीने रुग्णालयात वेळीच उपचार मिळाल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.
उरण परिसरातील जंगल, डोंगर -दऱ्या, दलदलीच्या जागा नष्ट झाल्या आहेत.परिणामी उरण परिसरात नागरी वस्तीत सापांचा वावर वाढला आहे.त्यामुळे विषारी सर्पदंशाच्या घटनाही वाढल्या असल्याचे निदर्शनास आल्या आहेत.चिरनेर येथील आशिष खारपाटील खाडीत मासेमारीसाठी गेला होता.खाडीत जाळ लावण्यासाठी जात असतानाच भक्षासाठी दबा धरून बसलेल्या अति विषारी घोणस जातीच्या सर्पाने दंश केला.केळवणे येथील ज्योती पाटील ही महिला शेतात काम करत असताना तिलाही विषारी घोणस सर्पाचा दंश झाला. सद्या त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार घेत असुन उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर आहे.रानसई येथील मनोज खारपाटील झाडांना पाणी देत असताना अनोळखी विषारी सर्पाचा दंश झाला.जिते येथील प्रशांत म्हात्रे याला विषारी नागाने दंश केला आहे.कासारभाट येथील तुषार पाटील यालाही अति विषारी वायपरने दंश केला होता.जोहे येथील नानु पाटील यांनाही विषारी क्रेट जातीच्या सर्पाने दंश केला होता.सर्पमित्रांच्या मदतीने रुग्णांना लागलीच रुग्णालयात दाखल केल्याने आणि विविध रुग्णालयात तातडीने उपचार मिळाल्याने आतापर्यंत
सर्पदंशाने कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी दिली.जंगल, परिसरात डोंगर -दऱ्या, दलदलीच्या जागा नष्ट झाल्या आहेत.त्यामुळे
उरण परिसरात नागरी वस्तीत सापांचा वावर वाढला आहेच.त्याशिवाय मागील आठवडाभरातील परिसरातील वाढत्या सर्पदंशाच्या घटनांमुळे सापांची दहशतही वाढली असल्याचे केणी यांनी सांगितले.