आविष्कार देसाईलोकमत न्यूज नेटवर्क-अलिबाग : निवडणुका लढण्याची खुमखुमी काही औरच असते. काही प्रमुख राजकीय पक्ष सोडल्यास ज्यांची ताकद नसते तेही निवडणुकीत उडी घेतात; परंतु त्यांचे डिपॉझिट वाचेल एवढेदेखील त्यांना मतदान होत नाही. १९६२ ते २०१४ या कालावधीत पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल ७९ जणांनी नशीब आजमावले होते. मात्र, ५९.४९ म्हणजेच सुमारे ६० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती.आताचा रायगड आणि आधीचा कुलाबा लोकसभा मतदारसंघामध्ये १९५२ पासून निवडणुका होत आहेत. या मतदारसंघावर काँग्रेस आणि शेकाप यांच्या उमेदवाराने आलटून पालटून खासदारकीची सत्ता उपभोगली आहे. काँग्रेसचा उमेदवार आठ वेळा, शेकापचा सहा वेळा आणि शिवसेनाचा दोन वेळा उमेदवार निवडून आलेला आहे.रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्या पाठीशी मतदारांची मोठी व्होटबँक आहे. असे असतानाही काही राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी सातत्याने निवडणूक लढल्याचे दिसून येते. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव तर झालाच आहे. शिवाय, उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना भरावी लागलेली डिपॉझिटची रक्कम ते वाचवू शकलेले नाहीत.डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाही तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.
मतदारसंघात आतापर्यंत ६०% उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:50 PM