नेरळ : कर्जत शहरातील टेकडीवर असणाऱ्या कर्जत तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, या रस्त्यांची रुंदीदेखील कमी झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागानेदेखील दुर्लक्ष केले आहे. कोणीही या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने नेरळ-कोल्हारे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी स्वतः स्वखर्चाने या रस्त्यांची साइडपट्टी आणि रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.कर्जत येथील तहसील कार्यालयात दररोज हजारो नागरिक हे अनेक कामानिमित्त कर्जत तहसील कार्यालायत येत असतात. तसेच येथे जवळच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यालयदेखील आहे. येथेही अनेक नागरिक ये- जा करत असतात; परंतु हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही. पावसाच्या पाण्याने या रस्त्याची धूप होऊन हा रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत आहे. रस्ता चढ-उताराचा आणि वळणदार असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोक्याचे झाले आहे.त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना कोणताही अपघात होऊ नये, यासाठी नेरळ -कोल्हारे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी शासनाला, आणि लोकप्रतिनिधींना लाजवेल असे काम हाती घेतल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच शासन यापुढे तरी कर्जत तहसील कार्यलयाकडे जाणारा रस्ता चांगल्या दर्जाचा करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकप्रतिनिधींचे होत आहे दुर्लक्षकर्जत येथील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी, अनेक शासकीय अधिकारी ये-जा करत असतात, अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, कर्जत पंचायत समितीचे सभापती, आमदार, खासदार, मंत्री महोदयदेखील या मार्गाने प्रवास करतात. परंतु यांनाही या रस्त्याची झालेली दुरवस्था दिसत नाही, हे आश्चर्य.
लोकप्रतिनिधी लक्ष देईना, प्रशासन मनावर घेईना; सामाजिक कार्यकर्त्यानं स्वखर्चातून सुरू केलं रस्त्याचं काम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 2:04 AM