सायकलवर प्रवास करून दिला सामाजिक संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:28 AM2019-06-15T01:28:15+5:302019-06-15T01:28:37+5:30
किल्ले संवर्धनावर भर : पाणीबचत, स्वच्छतेबरोबरच इंधनबचतीसाठी आवाहन
पनवेल : बारामतीहून दहा दिवस सायकलवर प्रवास करून स्वच्छता, पाणीबचत व किल्ले संवर्धनाचा संदेश एक अवलिया देत आहे. शुक्रवारी त्याचे पनवेलमध्ये आगमन झाले. यावेळी १२२० किलोमीटरचा प्रवास केल्याची माहिती त्यांनी दिली.
बारामतीतील सुभाष चौक येथून ७ जून रोजी एकनाथ जनार्दन देशमाने (४८) हे सायकलवरून किल्ले संवर्धन, पाणीबचतीचा संदेश घेऊन निघाले आहेत. शुक्रवारी ते पनवेमध्ये दाखल झाले आणि पुढील दोन दिवसांत पुन्हा बारामतीत घरी परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीहून निघाल्यानंतर देशमाने यांनी आळंदी, तळेगाव, लोणावळा, कारला-भाजला लेणी, कलावंतीन गड, प्रबळगड आदी ठिकाण सायकलवर भ्रमंती केली. शेवटी एकवीरा देवीचे दर्शन घेऊन बारामतीला परतणार आहेत. कलावंतीन गड, प्रबळगड येथे जाऊन त्यांनी ट्रेकर्सची भेट घेतली. या वेळी त्यांनी गडाची स्वच्छता करून इतरांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी आतापर्यंत एक हजार २२० कि.मी.चा सायकल प्रवास करून किल्ले संवर्धनाचा संदेश दिला आहे.
च्एकनाथ देशमाने हे सलग दहा दिवस सायकलवर प्रवास करत असून त्यांनी इंधनबचत, पाण्याचा वापर जपून करा, असा मौलिक संदेश दिला आहे. त्यासोबतच पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, असे आवाहन केले आहे.