मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीएच्या उभारण्यात येत असलेल्या चौथ्या बंदराच्या ( पीएसए ) दुसऱ्या टप्प्यातील ५०० हेक्टर क्षेत्रावरील सुरू असलेल्या भरावाच्या कामात ठेकेदाराकडून स्थानिक लॉरी मालक संघटनेची फसवणूक करून अन्याय केला जात आहे.यामुळे संतप्त झालेल्या उरण-पनवेल विभाग लॉरी (टिपर) मालक सेवा संघाने निषेध नोंदवत माती भरावाचेच काम मंगळवार पासून बंद केले आहे.४०० डंपरने भरावाचे काम बंद केल्याची माहिती बुधवारी (१४) मालक सेवा संघाने पत्रकार परिषदेतून दिली.
जेएनपीए अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्वात मोठ्या लांबीच्या चौथ्या बंदराचे काम सुरू आहे.बंदर उभारण्याचा दुसरा टप्पा पुर्णत्वास गेल्या नंतर आठ हजार कोटी खर्चाच्या बंदरातुन दरवर्षी ५० लाख कंटेनर मालाची हाताळणी केली जाणार आहे.या बंदरातील दुसऱ्या टप्प्यातील ५०० हेक्टर क्षेत्रावर समुद्रात माती भरावाचे काम एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे.या बंदराचे दुसऱ्या टप्प्याचे काम मन इंन्फ्रास्टक्चर कंपनीला दिले आहे.या कंपनीने सब कॉन्ट्रक्ट मेसर्स जे.एम. म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. व ठाकूर इंन्फ्रा प्रा.लि.या दोन कंपन्यांना जॉइंट व्हेंन्चर मध्ये (जेव्ही) दिले आहे.या दोन्ही कंपन्यांनी माती भरावाचे काम सुरू करताना मे २०२२ मध्ये प्रती ब्रास १०५० रुपये दर ठरविण्यात आला होता. त्यानंतर एक ऑक्टोबरपासून वाढीव दर देण्याचा लेखी करारही जेव्ही कंपन्यांनी उरण-पनवेल विभाग लॉरी (टिपर) मालक सेवा संघासोबत करण्यात आला आहे.मात्र वाढीव दर देण्याच्या आश्वासनानंतरही दर वाढवून देण्यात जेव्ही कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात आहे.त्या संतप्त झालेल्या उरण-पनवेल विभाग लॉरी (टिपर) मालक सेवा संघाच्या ४०० डंपर गाड्यांनी मंगळवार पासून माती भरावाचे काम बंद केले असल्याची माहिती बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.
ठाकूर - म्हात्रे यांच्या जेव्ही कंपनीकडून उरण-पनवेल विभाग लॉरी (टिपर) मालक सेवा संघाच्या ४०० डंपर मालकांची फसवणूक करीत आहेत.यातुन कमिशनच्या नावाखाली डंपर मालकांची ट्रीप मागे हजारो रुपयांची लूट सुरू केली आहे.स्थानिक डंपर मालकांना योग्य मोबदला मिळत नसल्यामुळेच संघटनेच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारपासून उरण-पनवेल विभाग लॉरी (टिपर) मालक सेवा संघाच्या ४०० सदस्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी त्यांनी कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.