सोलनपाडा पाझर तलावाला लागली गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:24 AM2019-07-29T01:24:33+5:302019-07-29T01:24:57+5:30
आमदारांकडून पाहणी : ग्रामस्थांचे स्थलांतर; भीतीचे वातावरण
कर्जत : तालुक्यातील जामरुंग जवळ असलेल्या सोलनपाडा पाझर तलावातून पाणी गळती सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी २६ जुलैपासून स्थलांतरण केले आहे. धरणाची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी सोलनपाडा येथे जाऊन धरणाची पाहणी केली. यावेळी लघुपाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी धरणाची पाहणी करण्यासाठी पोहचला नाही.
कर्जत तालुक्यात १९८० साली बांधलेल्या सोलनपाडा येथील पाझर तलावाची दुरुस्ती रायगड जिल्हा परिषदेने तब्बल ६ कोटी रुपये खर्चून पाच वषार्पूर्वी केली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणाच्या परिसरात २०० मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे खोदकाम आणि सुरुंगस्फोट करण्यास बंदी असताना देखील १०० मीटर अंतरावर खासगी जमीन घेणाऱ्यांनी खोदकाम आणि सुरुंग स्फोट केले आहेत. त्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात धरणाच्या मुख्य बांधामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊ लागली होती. २६ जुलैच्या रात्री धरण भरून वाहू लागल्यानंतर मात्र धरणाच्या बांधामधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पाणी गळती बघून ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यांनी रात्रीच गाव सोडून सुरक्षित ठिकाण म्हणून जामरुंग गाव गाठले. आतापर्यंत तेथे सोलनपाडा ग्रामस्थांनी दोन रात्र मुक्काम केला आहे. मात्र ग्रामस्थांची भीती काही कमी झाली नाही अशी माहिती स्थानिक रहिवासी मंगेश सावंत यांनी दिली आहे.
धरण फुटून कोणताही अपघात होऊ नये यासाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी सोलनपाडा धरणावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती नारायण डामसे, स्थानिक जेष्ठ कार्यकर्ते अशोक सावंत,भास्कर देसले, माजी सरपंच हरेश घुडे,पंढरीनाथ पिंपरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी तालुक्याचे तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार संजय भालेराव उपस्थित होते. आमदार लाड यांना धरणाची स्थिती आणि धोका यांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. एवढे धोकादायक धरण क्षेत्र झालेले असताना लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी अजूनपर्यंत धरण परिसरात फिरकले नाहीत.
डोंगरपाडा धरण वाहून गेल्यानंतर त्या भागातील जनतेने पाणीटंचाई काय असते हे अनुभवले आहे. आपण सोलनपाडा पाझर तलावाची प्राधान्य देऊन दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे माहिती मिळताच पाझर तलावाची स्थिती अभियंत्यांकडून जाणून घेतली. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी नियोजन करणार आहे.
- सुरेश लाड,
आमदार कर्जत