नौदल तळावर सौरऊर्जा प्रकल्प; ई-उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:41 PM2020-07-22T23:41:23+5:302020-07-22T23:41:32+5:30
करंजा येथे दोन मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती
उरण : वीजपुरवठ्यासाठी वीज कंपन्यांवर अवलंबून राहण्याऐवजी सौरऊर्जेचा स्रोत निर्माण करून आत्मनिर्भर होण्याची तयारी भारतीय नौदलाने सुरू केली आहे. याची सुरुवात म्हणून उरण येथील करंजा नौदल तळावर संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जेवर चालणाऱ्या वीजनिर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात यश मिळविले आहे. करंजा येथील नौदल तळावर उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी सौरऊर्जा प्रकल्पाचे ई-उद्घाटन नुकतेच भारतीय नौदलाचे व्हाइस अॅडमिरल अजित कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
उरण परिसरात करंजा येथील नौदल तळावर दोन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या सौरऊर्जेच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे सूर्यप्रकाशावर आधारित असलेल्या सौर पॅनेलची रचना सूर्याच्या बदलत्या दिशेप्रमाणे फिरण्यासाठी केली आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
सौरऊर्जेवर आधारित असलेला हा प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या सौर संयंत्रांपैकी एक आहे. सोलर प्लांटमध्ये शतप्रतिशत स्वदेशी विकसित सौर पॅनेल, ट्रॅकिंग टेबल्स आणि इन्व्हर्टर आहेत. कॉम्प्युटराइज्ड मॉनिटरिंग व कंट्रोलसह सिंगल अॅक्सिस सन ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हे ग्रीड आणि सौरऊर्जा पॅनेल संगणकीय प्रणालीशी जोडण्यात आले आहेत.
स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर
रऊर्जेवर आधारित हा प्रकल्प नौदल तळाच्या वीजपुरवठ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तसेच हा प्रकल्प सौर व अक्षय ऊर्जेचा वापर करण्याच्या दिशेने भारतीय नौदलाचे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. च्विजेची संपूर्णपणे गरज भागवून विजेची आणि पैशाची मोठ्या प्रमाणावर बचत करणारे स्वदेशी बनावटीचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प देशभरातील असलेल्या नौदल तळावरही उभारण्यात येणार असल्याची माहिती व्हाइस अॅडमिरल अजित कुमार यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.