अलिबाग : देशाच्या सीमेचे रक्षण सैनिक करत असतात. प्रसंगी ते आपल्या प्राणाची आहुती देतात. त्यांच्यामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. सीमा सुरक्षित राहिल्यामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. म्हणूनच सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनात सहभाग घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय विभागानेही त्यांना दिलेला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांनी गुरुवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी अनेक सैनिक आपले बलिदान देतात. अशा आजी-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. ध्वजदिन निधी संकलनातून आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी शिक्षण शिष्यवृत्ती, वस्तिगृहासाठी निधी, अशा विविध योजना राबविण्यात येतात. तसेच माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी सैनिक कल्याण विभागामार्फत काम केले जाते, ध्वजदिन निधी संकलनाचा राज्याचा इष्टांक २६ कोटी २६ लाख रु पये इतका होता तर रायगड जिल्ह्याचा इष्टांक ४९ लाख ५९ हजार इतका असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी दिली. याप्रसंगी रायगड जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना राज्य शासनाचे स्मृतीचिन्ह माजी कॅप्टन विद्या रत्नपारखी यांनी दिले. गुणवत्ता यादीत आलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)
सैनिकांमुळेच देशाच्या सीमा सुरक्षित
By admin | Published: December 12, 2015 1:43 AM