आपद्ग्रस्तांसाठी कष्ट घेतल्याचे मिळाले समाधान; महाडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:43 AM2018-08-02T01:43:00+5:302018-08-02T01:43:28+5:30

गेल्या वर्षी १ आॅगस्टला नाइट राउंडला असताना वायरलेस सेटवर मेसेज मिळाला, ‘गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळील पूल कोसळला...

Solution found that suffering for the victims; Memon of then Inspector of Mahad Ravindra Shinde | आपद्ग्रस्तांसाठी कष्ट घेतल्याचे मिळाले समाधान; महाडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या आठवणी

आपद्ग्रस्तांसाठी कष्ट घेतल्याचे मिळाले समाधान; महाडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या आठवणी

Next

- जयंत धुळप

अलिबाग : गेल्या वर्षी १ आॅगस्टला नाइट राउंडला असताना वायरलेस सेटवर मेसेज मिळाला, ‘गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळील पूल कोसळला... काही गाड्या सावित्री नदीच्या पुरात वाहून गेल्यात...’ तत्काळ पुलाजवळ पोहोचलो, अर्धा पूल तुटून नदीत कोसळल्याचे दिसले... त्याच क्षणाला पत्नीचा फोन आला, ‘बाबांची तब्येत बरी नाही, त्यांना कल्याणला हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल केलेय, तुम्ही ताबडतोब या...’ तेव्हा मनाची मोठी घालमेल झाली... त्या वेळी मी केवळ येतो सांगितले आणि समोर आलेल्या प्रसंगाला प्रथम सामोरे जाण्याचा निर्णय घेतला... अशा अंगावर काटा आणणाऱ्या स्मृती महाडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सांगितल्या. या दुर्घटनेत कर्तव्यावर असताना वडिलांची अखेरची भेट झाली नाही याचे शल्य मनात होते. पण त्याच वेळी जे काम मी करीत होतो त्याचे समाधान माझ्या वडिलांना मी अखेरच्या क्षणी देऊ शकलो याचे मात्र समाधान वाटते, असे ते म्हणाले.
ते सांगतात, पत्नीचा फोन ठेवला आणि दुसरा तिसरा काहीही विचार न करता... प्रथम वाहतूक थांबविली, शक्य ती आपत्ती निवारणात्मक उपाययोजना अंमलात आणली. भीषण अंधार... धोधो पाऊस... किती गाड्या वाहून गेल्या काही अंदाज नाही... सारे वातावरण भीतिदायक होते. त्यानंतर रातोरात जिल्हा, राज्य आणि केंद्रीय स्तरावरील सारी यंत्रणा सक्रिय कार्यरत
झाली.
रत्नागिरी जिल्ह्यातून निघालेल्या दोन एसटी बसेस मुंबईत अपेक्षित वेळी पोहोचल्या नव्हत्या, त्या पूल पडला त्या वेळीच येथे असण्याची दाट शक्यता होती आणि अखेर तीच शक्यता खरी ठरली. त्यातच एक तवेरा गाडीदेखील वाहून गेल्याची खातरजमा झाली. रायगडचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि तत्कालीन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले रातोरात घटनास्थळी पोहोचले. सावित्री नदीकिनारी दोन्ही बाजंूनी शोधमोहीम सुरू करण्यात आली. मध्यरात्र सरकून पहाट जशी होऊ लागली तसे आक्रोश करीत सावित्री पुलाजवळ पोहोचणारे रत्नागिरीमधील नातेवाईक, वातावरण अत्यंत गंभीर करून टाकत होते.
महाड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांनी आपत्ती निवारणाकरिता सहकार्याचा हात पुढे केला. सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. प्रत्यक्ष घटनेचा प्रथमदर्शी मी असल्याने त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली आणि आपल्या फायबर बोटींच्या माध्यमातून खळाळत वाहणाºया सावित्रीच्या प्रवाहात शोधमोहीम सुरू केली. त्यांना आवश्यक ती सारी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मी त्यांच्या सोबतच होतो, असे सांगून शिंदे काही क्षण थांबले.

अखेर वडिलांचे निधन झाले...
पुढील चार दिवस शोधमोहिमेत एसटीचे अवशेष सापडले, बानकोटच्या खाडीत मृतदेह सापडले. पण तिकडे बाबांची तब्येत पुन्हा गंभीर झाली. आता तरी तुम्ही या, असा पत्नीचा फोन आला. पण मी गेलो नाही. आणि अखेर ७ आॅगस्ट २०१७ रोजी वडिलांचे निधन झाले. निधन झाले आहे आता तरी निघा, असा पत्नीचा निर्वाणीचा फोन आला.
तिला सांगितले, बाबांचे शव रुग्णवाहिकेतून घेऊन गावी (चोपडा-जळगाव) निघा, मी येथून निघतो. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना हा कौटुंबिक प्रसंग सांगितला. त्यांना धक्काच बसला आणि अखेर सावित्रीच्या किनाºयावरून गावी निघालो, अशी आठवण त्यांनी सांगितली.

वडिलांना माझा अभिमान वाटला
पुन्हा पत्नीचा फोन आला, तुम्ही येताय ना, बाबा तुमची आठवण काढताहेत. मी केवळ हो साहेबांशी बोलतो आणि निघतो असे सांगितले आणि फोन ठेवला. पण आपत्तीमधील हे काम अर्धवट सोडून आपण जावे यासाठी माझे मन तयार नव्हते. अखेर दुसºया दिवशी या दुर्घटनेची बातमी पत्नीने पाहिली तेव्हा तिला सारा उलगडा झाला. तिने ती बातमी बाबांना हॉस्पिटलमध्ये वाचून दाखविली आणि पत्नीचा पुन्हा फोन आला, बाबांना तुमचा अभिमान वाटत असल्याचे तिने सांगितले.

Web Title: Solution found that suffering for the victims; Memon of then Inspector of Mahad Ravindra Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड