शिवपूर्वकालीन स्वयंभू पाचाडची सोमजाई देवी; जिजाऊ माँसाहेबांचे श्रद्धास्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:02 AM2018-10-10T00:02:44+5:302018-10-10T00:03:03+5:30
हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाचाड गावात जिजाऊ माँसाहेबांचा वाडा आणि त्यांची समाधी यामधील जागेत सोमजाई देवीचे मंदिर आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पाचाड गावात जिजाऊ माँसाहेबांचा वाडा आणि त्यांची समाधी यामधील जागेत सोमजाई देवीचे मंदिर आहे. शिवपूर्वकाळापासून अस्तित्वात असलेली ही सोमजाई देवी जिजाऊ माँसाहेबांचे असीम श्रद्धास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या अटीतटीच्या लढायांच्यावेळी यशप्राप्तीसाठी माँसाहेबांकडून सोमजाई देवीचा कौल घेतला जाई. सोमजाईने दिलेला कौल आणि नवस वास्तवात उतरल्याची अनेकांची अनुभूती आहे आणि म्हणूनच वर्तमानात पाचाडची ग्रामदेवता असणाऱ्या या सोमजाई देवीचे महत्त्व आणि माहात्म्य अनन्यसाधारण असेच मानले जाते.
जिजाऊ माँसाहेब यांच्या समवेत त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई राजवाड्यात राहत असत. दररोज उभयता सोमजाईची पूजा करून देवीचे दर्शन घेत असत,अशी नोंद इतिहासात आहे. मौखिक परंपरेतून सोमजाई देवीच्या महत्त्व आणि महात्म्याच्या अनेक कथा शिवकालापासून चालत आल्या आहेत. स्वयंभू आणि जागृत अशा या सोमजाई देवीला परिसरातील गाई येऊन दुधाच्या धारा देऊन जात होत्या अशी मौखिक परंपरेतून आलेली कथा पाचाडचे माजी सरपंच आणि असीम शिवभक्त रघुवीर देशमुख यांनी सांगितली. सोमजाई देवीच्या मंदिरासमोर जिजाऊ माँसाहेबांनी त्याकाळी बाग तयार केली होती, ती ‘राणीची बाग’म्हणून ओळखली जाई. आजही प्राचीन शिवमंदिर आणि गणेश मंदिराचे पुरातन अवशेष आढळतात.
जिजाऊ माँसाहेबांच्या काळात सोमजाई देवीच्या मंदिरामागे संपूर्ण पाचाड गाव वसलेले होते. घरांची जोती, घरांचे पुरातन अवशेष आजही त्या गावाची साक्ष देतात. सुमारे २०० वर्षांपूर्वी महामारी आली आणि गावात मोठा मृत्यूप्रकोप झाला. त्यानंतर सुमारे १५० वर्षांपूर्वी मोठे भूस्खलन झाले आणि संपूर्ण गाव गाडले गेले आणि दुसºयांदा गाव उठले आणि वर्तमानात असलेल्या जागी पाचाड गाव वसले.
सोमजाई देवीचा सहाणेवरील आगळा ऐतिहासिक नवरात्रोत्सव
सोमजाई देवीच्या समोर देवीचा ‘सहाण’ आहे. याच सहाणेवर देवीचा पारंपरिक नवरात्रोत्सव आणि होळीचा सण साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आजही अबाधित आहे. सोमजाईचे प्राचीन मंदिर आणि मूर्ती काहीशी जीर्ण झाल्याने १० वर्षांपूर्वी २००८ मध्ये शिवभक्त देशमुख यांच्या पुढाकाराने आणि सर्व पाचाड ग्रामस्थ यांच्या सहयोगाने सोमजाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. सोमजाई देवीचा आगळा नवरात्रोत्सव प्राचीन परंपरा अबाधित राखून आजही करण्यात येतो.