कोणी नदी, कोणी तलाव, कोणी समुद्र किनाऱ्यावर बुडाले; महिन्यात १३ मृत्यू
By निखिल म्हात्रे | Published: June 30, 2024 03:23 PM2024-06-30T15:23:58+5:302024-06-30T15:24:34+5:30
जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : पावसाळा सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात सात अल्पवयीन मुलांसह १३ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सात पर्यटकांचा समावेश आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
अलिबाग तालुक्यातील मुनवली गावात २३ जून रोजी दोन किशोरवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर २२ जून रोजी दादली गावातील २१ वर्षीय तरुणाचा सावित्री नदीत पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाला. त्याच दिवशी काल नदीत पोहताना ३२ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील पोखरवाडी धरणात २१ जून रोजी मुंबईतील १७ ते २६ वयोगटातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलिबाग समुद्रात पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. अशाच एका २७ वर्षांच्या तरुणचा १३ जून रोजी समुद्रात बुडून मृत्यू झाला.
उरण तालुक्यातील पिरकोन गावात ९ जून रोजी हृदयद्रावक घटनेत २५ वर्षीय महिला आणि तिच्या ७ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही महिला तलावात कपडे धुवत असताना ही घटना घडली होती. या आधी २८ मे रोजी मुंबईतील एका व्यक्तीचा काशीद समुद्रकिनारी समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर २५ मे रोजी भिरा गावात एका पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
पोहण्यासाठी गेलेल्या १३ जणांना गेल्या महिनाभरात जीव गमवावा लागला. अतिउत्साहीपणा न करता पाण्याचा अंदाज घेऊन नागरिकांनी पोहण्यासाठी उतरावे. पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक
पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुर्घटना होत आहेत. समुद्रावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. अनेकांना समुद्राच्या उधाणाचा अंदाज येत नाही. पोहण्यासाठी जाण्याआगोदर त्या स्थळाविषयीची माहिती आवर्जून घ्यावी.
- मंदार पावशे, नागरीक