पोलादपूर : मुंबई येथील ३७ वर्षीय व्यक्तीची मानसिकस्थिती ठिक नसल्याने तो घरातून निघून गेला होता. मात्र लोहार येथील नागरिकांच्या सतकतेमुळे या व्यक्तीस आई वडिलांच्या स्वाधीन करण्यास पोलिसांना यश आले आहे.
सजल मधुकर पाटील (३७ रा. चेंबूर मुंबई मूळ रा. जळगाव) हा त्याच्या डोक्यावर ताण तणाव असल्याने घरातून निघून चिपळूण बाजूकडे गेला होता. त्यानंतर तो तेथून रविवारी पोलादपूर लोहरे येथे कोणत्यातरी वाहनाने येवून दुपारी १ वाजताच्या सुमारास लोहरे नाक्यावर आला असता तो इकडे तिकडे सैरभैर होऊन पाहत असल्याने तेथे उपस्थित असलेले दीपक उतेकर, सुशांत गोळे, पांढरी साळुंखे, समीर साळुंखे आदींना संशय आला. ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून सजल यास पोलादपूर पोलीस ठाणे येथे आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता नाव समजले मात्र त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने त्याला घरचा पत्ता सांगता येत नव्हता, परंतु पोलीस हवालदार दिपक जाधव, इकबाल शेख, विनोद महाडिक, विजय चव्हाण, आशिष नटे यांनी सोशल मीडिया, व फेसबुकच्या आधारे त्याच्या आई, वडिलांचा शोध घेतला. त्याची आई शुभना मधुकर पाटील या फेसबुक वर मिळून आल्या व त्याचा मोबाइल नंबर पोलिसांना प्राप्त झाला त्यांना संपर्क साधून त्यांना त्यांच्या मुलाचा फोटो पाठवून खात्री केली. तेंव्हा सजल पाटील हा त्यांचाच मुलगा असल्याने व त्याच्या डोक्यावर मानसिक ताण असल्याचे त्याच्या आईकडून समजले तसेच त्याचे वडील मधुकर पाटील यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधून मुलाला तेथेच ठेवा आम्ही नेण्यासाठी येत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्याचे वडील मधुकर पाटील हे पेशाने डॉक्टर असून ते जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार आहेत. रविवारी रात्री ८ वाजता आई, वडिलांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात येऊन मुलाला ताब्यात घेतले.