कोंडगावच्या पोटनिवडणुकीत सोनल वाघ विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 01:43 AM2019-06-25T01:43:23+5:302019-06-25T01:43:42+5:30
कोंडगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येऊन शेकापच्या सोनल सुभाष वाघ यांनी सरळ लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनाली कृष्णा धामणे यांचा ५४ मतांनी पराभव करीत विजय मिळवला.
नागोठणे : विभागातील कोंडगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येऊन शेकापच्या सोनल सुभाष वाघ यांनी सरळ लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनाली कृष्णा धामणे यांचा ५४ मतांनी पराभव करीत विजय मिळवला. शेकापच्या प्रतिभा राजीवले यांचा जातीचा दाखला अवैध ठरविल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
जिल्ह्यात शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे असल्याचे स्पष्ट झाले होते व राष्ट्रवादीला सेनेने सहकार्य केले असल्याचे उघड झाले होते. ग्रामपंचायतीत शेकापची सत्ता आहे. कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीत शेकापने केलेल्या विकासकामांमुळेच विजय मिळाला असल्याचे सरपंच अनंत वाघ यांनी स्पष्ट केले.
कळंब गटाची पोटनिवडणूक सीमा पेमारे बिनविरोध
नेरळ : कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कळंब गटाच्या रिक्त असलेल्या सदस्यपदाची पोटनिवडणूक सोमवारी बिनविरोध झाली. शेतकरी कामगार पक्षाने सर्व राजकीय पक्षांना दिवंगत सदस्य सुदाम पेमारे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. दिवंगत सुदाम पेमारे यांच्या पत्नी सीमा सुदाम पेमारे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली असून २४ जून रोजी बिनविरोध विजयी झाल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांच्या हस्ते देण्यात आले.
२८ मे २०१८ रोजी कर्जत तालुक्यातील कळंब या जिल्हा परिषद गटातील सदस्य सुदाम पेमारे यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. सुदाम पेमारे हे २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. सव्वा वर्षे सदस्य म्हणून काम केल्यानंतर पेमारे यांचे निधन झाले आणि त्यानंतर कळंब जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक सहा महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र तब्बल वर्षानंतर कळंब या जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली.
पोटनिवडणुकीत आघाडीचे प्रदीप म्हात्रे विजयी
पेण : पेण पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी पेण प्रांत कार्यालयात होवून त्यामध्ये शेकाप, काँग्रेस, राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार प्रदीप म्हात्रे हे चुरशीच्या लढतीत ७२ मतांनी विजयी झाले. प्रदीप म्हात्रे यांना ४ हजार ४०९ मते मिळाली तर शिवसेना भाजपचे उमेदवार प्रथमेश जांभळे यांना ४ हजार ३३७ मते मिळाली.
या विजयामुळे भाजपचे पेण पंचायत समितीत चंचुप्रवेश करण्याचे मनसुबे धुळीला मिळाले असून संजय जांभळे यांना हा मोठा धक्का देण्यात आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हा विजय खेचून आणल्याचे एकंदर निकालातील झालेल्या मतदानातून स्पष्ट झाले आहे.