लवकरच बहुजनांचा विचार करणारा निर्णय
By admin | Published: July 8, 2016 03:46 AM2016-07-08T03:46:15+5:302016-07-08T03:46:15+5:30
महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची नितांत गरज आहे. शेकाप आणि राज्यातील पुरोगामी विचारांच्या संस्था व संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांतून लवकरच बहुजन समाजाचा विचार करणारा आशादायक
- जयंत धुळप, अलिबाग
महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची नितांत गरज आहे. शेकाप आणि राज्यातील पुरोगामी विचारांच्या संस्था व संघटनांच्या संयुक्त प्रयत्नांतून लवकरच बहुजन समाजाचा विचार करणारा आशादायक निर्णय संपूर्ण राज्याला पहायला मिळेल, अशी घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी केली.
आमदार जयंत पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने येथील रायगड बाजारशेजारील प्रांगणात आयोजित अभीष्टचिंतन सोहळ््या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून आमदार पाटील व त्यांच्या पत्नी सुप्रिया पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या हस्ते अलिबाग नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ‘लोकनेते अॅड. दत्ता पाटील भवन’ असे नामकरण करण्यात आले.
आमदार पाटील म्हणाले की, बहुजनांचे राजे असणाऱ्या छत्रपतींच्या घराण्याचा वारसा चालविणाऱ्या छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या हस्ते माझा सत्कार झाल्याने आयुष्याचे सार्थक झाले. जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल तर काय घडू शकते हे शेकाप कार्यकर्ते व सहकारी कार्यकर्त्यांनी मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त गावांमध्ये स्वत:ला झोकून देवून केलेल्या कामातून दाखवून दिले.कोणताही व्यक्तिगत स्वार्थ आणि कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता नद्या रुंदीकरणाचे काम सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी केले आणि त्यातून नवा आत्मविश्वास मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त बहुजन समाजाला गवसला असल्याचे त्यांनी सांगितले. यातून पक्षाबाहेरचे शेकडो कार्यकर्ते शेकापला जोडले गेले. या पुढच्या काळात जनसामान्यांचे प्रबोधन करुन बहुजनांच्या हिताचे राजकारण करण्यासाठीच राज्यातील प्रवीण गायकवाड यांच्या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ अशा सर्व पुरोगामी विचारांच्या संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची विचारविनिमय बैठक येत्या काही दिवसांत पन्हाळगडावर घेण्यात येत असून त्यात बहुजन समाजाचा विचार करणारा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आ. पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी शाहू महाराजांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेवून कार्यक्रमाचे औचित्य विषद केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, आ. धैर्यशील पाटील, विलास तावरे, राहुल पोकळे आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी करमाळ््याचे आ. नारायण पाटील, अलिबागचे आ. पंडित पाटील, माजी आ. विवेक पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, उद्योजक जे.एम.म्हात्रे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपी मेरिटाईम कंपनीचे संचालक नृपाल पाटील, भैरवी आंग्रे, माजी जिल्हाधिकारी शामसुंदर शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप नाईक यांनी केले.
बहुजन समाज एकत्र राहिला तरच विकास
- छत्रपती श्री शाहू महाराज म्हणाले की, रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि येथूनच त्यांनी रयतेचे बहुजनांचे राज्य करण्यास प्रारंभ केला पुढे ते आग्रा-तंजावर, श्रीशैलम-हैद्राबादपर्यंत पोहोचले. अशाच पराक्रमी आणि बहुजनांच्या सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचेही नेतृत्व या प्रांताला लाभले. कोकणातूनच बहुजन हिताचा विचार जन्माला येवून पुढे गेला. इतिहासातून आपण शिकले पाहिजे, बहुजन समाज एकत्र राहिला तरच महाराष्ट्राचा विकास होवू शकतो. शाहू महाराजांनी समतेतूनच समाजबांधणी करुन बहुजनांचा विकास साधला. धर्मावर राजकारण करुन देश पुढे जाणार नाही. सर्वांना समान मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिद्दी कार्यकर्त्यांचा गौरव : मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये नदी जलसंवर्धनाचे काम करणाऱ्या मराठवाड्यातील सुमारे ६० कार्यकर्त्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसोबतच्या नातेवाइकांना भोजनाची मोफत सुविधा देणाऱ्या कच्छी भुवन ट्रस्ट या संस्थेस आमदार पाटील यांच्याकडून १ लाख २१ रुपयांचा तर नमिता नाईक प्रथम स्मृतीदिनानिमित्त नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडून १ लाख २१ रुपयांचा असे दोन धनादेश कच्छी भुवन ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश शाहा व पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. अॅड. आस्वाद पाटील यांचा सत्कार के ला.